९८.८ टक्के लोकांचे चिनी वस्तूंच्या बहिष्काराला समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:12 PM2020-07-02T20:12:04+5:302020-07-02T20:12:36+5:30
संपूर्ण देशातील नागरिक चीनविरोधात एकजुटीने उभे आहेत आणि कोणत्याही स्थितीत आता चीनला धडा शिकवावा, अशी त्यांची इच्छा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील विविध वर्गातील लोकांमध्ये अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात ९८.८ टक्के लोकांनी चिनी वस्तूंच्या बहिष्काराचे समर्थन केले. हे सर्वेक्षण कन्फेडेरशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(कॅट)ने १९ ते २७ जूनदरम्यान देशाच्या विविध राज्यांमध्ये केले. ९,७३५ लोकांनी सर्वेक्षणात भाग घेऊन आपले मत जाहीर केले.
सर्वेक्षणात चीनसोबत सध्या असलेल्या परिस्थितीवर संबंधित नऊ प्रश्न विचारण्यात आले आणि प्रश्नांच्या उत्तराची टक्केवारी ९० पेक्षा जास्त होती. यावरून हे स्पष्ट होते की, या मुद्यावर संपूर्ण देशातील नागरिक चीनविरोधात एकजुटीने उभे आहेत आणि कोणत्याही स्थितीत आता चीनला धडा शिकवावा, अशी त्यांची इच्छा आहे.
‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, नऊ दिवसांच्या ऑनलाईन सर्वेक्षणात व्यापारी, लघु उद्योग, शेतकरी, हॉकर्स, ग्राहक, स्वयंउद्योजक, महिला उद्योजिका, गृहिणी, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांसह अनेक वर्गाने उत्स्फूर्तपणे भाग घेतला. कॅटने देशातील सर्व राज्यातील जवळपास ११ हजार लोकांना सर्वेक्षण फॉर्म पाठविले. त्यातून ९,७३५ लोकांनी आपले मत मांडले. सर्वेक्षणातील प्रश्नावलीमध्ये चीनने भारतीय सैन्याविरुद्ध केलेली कारवाई चुकीची आहे का, भारतीय सैन्यातील २० सैनिकांच्या मृत्यूने दु:खी आहात काय, या कारवाईबाबत चीनला धडा शिकवायचा काय, तुम्ही भारतीय सैनिकांसोबत उभे आहात काय, चिनी वस्तूंचा बहिष्कार करणार काय, चिनी वस्तूंची खरेदी व विक्री न करण्याची शपथ घेणार काय, अभिनेते व क्रिकेटर यांनी चिनी वस्तूंची जाहिरात करावी वा करू नये, चिनी कंपन्यांसोबतचे करार रद्द करावेत काय, चिनी कंपन्यांनी स्टार्टअपमध्ये गुंतविलेला पैसा चीनने परत न्यावा, आदींचा समावेश होता.
सर्व वर्गातील नागरिकांनी सरासरी ९८.८ टक्के चिनी वस्तू आणि चीनवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. नऊ दिवस चाललेल्या या सर्वेक्षणाचे लोकांनी स्वागत केले आहे. कॅट संपूर्ण देशात स्वदेशी वस्तूंचा अवलंब आणि चिनी वस्तूंचा बहिष्कार ही मोहीम राबवीत आहे. दिवाळीत चिनी वस्तूंची विक्री न करण्याची शपथ देशातील किरकोळ व्यापाऱ्यांनी घेतली आहे.