नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ९५.४८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 09:43 PM2017-11-28T21:43:30+5:302017-11-28T21:53:38+5:30
जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) जिल्ह्यातील मोठे, लहान नागरी तसेच संक्रमणात्मक मतदार संघातील निवडणुकीत मंगळवारी सरासरी ९५.४९ टक्के मतदान झाले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर: जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) जिल्ह्यातील मोठे, लहान नागरी तसेच संक्रमणात्मक मतदार संघातील निवडणुकीत मंगळवारी सरासरी ९५.४९ टक्के मतदान झाले.डीपीसीच्या ४० जागांपैकी २५ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता़ यापैकी सहा सदस्य अविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित १९ जागासाठी मतदान घेण्यात आले. आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे़ यासोबतच उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.
डीपीसीवर ४० सदस्यांची महानगरपालिका, नगरपालिका-नगरपंचायत व जिल्हा परिषद सदस्यांमधून निवड केली जाते. जिल्हा नियोजन समितीवर मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र अर्थात महापालिकेतून २० सदस्य निवडले जातात़ तर नगरपंचायत क्षेत्रातून १, नगर परिषद क्षेत्रातून ४ सदस्य निवडले जातात़ जिल्हा परिषदेतून १५ सदस्यांची निवड केली जाते़ परंतु जिल्हा परिषदेची निवडणूक व्हायची असल्याने या १५ जागा वगळून ही निवडणूक घेण्यात आली़ डीपीसीच्या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा किंवा स्थानिक संस्था बरखास्त होण्यापर्यंत असतो. जिल्ह्यातील विकास कामांचे नियोजन आणि त्याला मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हा नियोजन समितीला असतात़ जिल्ह्याच्या विकासाचा निधी नियोजन समितीमार्फत खर्च होतो़
मतदानाची टक्केवारी ९५़४८ टक्के
महादुला (१७),मौदा (१७),कुही (१७),भिवापूर (१४), हिंगणा (१७) या चार नगर पंचायतींमधील सदस्यसंख्या ८२ आहे़ यातील ८१ सदस्यांनी मतदानाचा हक्का बजावला़ तर, कामठी नगर परिषद (३३), उमरेड (२६),काटोल (२४),नरखेड (१८),मोहाड (१७),रामटेक (१८),कन्हान (१७),सावनेर (२१),कळमेश्वर (१८), खापा (१८), मोहपा (१८) वाडी (२६) या नगर परिषदांची एकूण सदस्य संख्या २५२ इतकी आहे़ यातील २४५ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला़ महानगरपालिकेतील १५१ सदस्यांपैकी १३९ सदस्यांनी मतदान केले़ मतदानाची टक्केवारी ९५़४८ टक्के इतकी आहे़ नगर पंचायतीच्या ८२ सदस्यांपैकी ८१ सदस्यांनी मतदान केले.
रिंगणातील उमेदवार
लहान नागरी क्षेत्र - नगर परिषद : सिंधू धनपाळ (कळमेश्वर), विजयालक्ष्मी भदोरिया (उमरेड), मनोहर पाठक (कन्हान, पारशिवनी), काशीनाथ प्रधान (कामठी), योगिता इटनकर (उमरेड), कल्पना कळंबे (मोवाड), वर्षा गजभिये (खापा, ता़ सावनेर), नरेश बर्वे (इंदोरानगर, कन्हान)
संक्रमणात्मक क्षेत्र - नगर पंचायत : संदीप खडसंग (भिवापूर), गुणवंत चामाटे (हिंगणा), राजकुमार सोमनाथे (मौदा)
मोठे नागरी मतदारसंघ - महापालिका : स्वाती आखतकर, जिशान मुमताज अन्सारी, प्रगती पाटील, स्नेहल बिहारे, विशाखा मोहोड, जगदीश ग्वालबन्शी, हरीश दिकोंडवार, बाल्या बोरकर, जुल्फेकार भुट्टो, रवींद्र भोयर, बंटी शेळके, मनोज सांगोळे, शेषराव गोतमारे, कमलेश चौधरी, संजय बालपांडे, नितीन साठवणे, सुनील हिरणावर,आशा उईके, यशश्री नंदनवार, निरंजना पाटील, वंदना भगत, भावना लोणारे.
भाजपाचे सहा सदस्य अविरोध
जिल्हा नियोजन समितीवर महापालिकेतून निवडून द्यावयाच्या २० जागांपैकी भाजपाचे सहा सदस्य अविरोध निवडून आले होते़ एकूण ३० उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी सरला नायक व शिल्पा धोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते़ ज्या गटांमध्ये काँंग्रेसने किंवा अन्य कोणत्याही पक्षाने अर्ज सादर केले नव्हते त्या गटातून भाजपाचे सहा नगरसेवक अविरोध विजयी झाले आहेत. यात धर्मपाल मेश्राम, विजय चुटुले (अनुसूचित जाती), पल्लवी शामकुळे, मनीषा धावडे, वंदना यंगटवार (इतर मागास प्रवर्ग महिला), गोपीचंद कुमरे (अनुसूचित जमाती) आदींचा समावेश आहे.