९,८९१ नागरिकांना दुसऱ्या डाेसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:35+5:302021-06-30T04:07:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : चिचाेली (खापरखेडा, ता. सावनेर) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत तयार करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवर एकूण १२,४८२ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : चिचाेली (खापरखेडा, ता. सावनेर) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत तयार करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवर एकूण १२,४८२ नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला डाेस देण्यात आला. यातील केवळ २,५९१ नागरिकांनाच दुसरा डाेस देण्यात आला असून, उर्वरित ९,८९१ नागरिक दुसऱ्या, तर १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील शेकडाे नागरिक काेराेनाच्या पहिल्या डाेससाठी प्रतीक्षेत आहेत. लसींच्या तुटवड्यामुळे ही समस्या उद्भवली असून, आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना विनाकारण नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार चिचाेली प्राथमिक आराेग्य केंद्रात १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांच्या लसीकरणाला (पहिला डाेस) सुरुवात करण्यात आली. या वयाेगटातील नागरिकांसाेबतच काेराेना प्रतिबंधक लसीचा दुसरा डाेस घेणारेही नागरिक राेज या लसीकरण केंद्रावर येत आहेत. वास्तवात, जिल्हा प्रशासनाकडून राेज कमी लसींचा डाेस येत असल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे.
या आराेग्य केंद्रांतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील १२,४८२ नागरिकांना काेराेनाचा पहिला डाेस देण्यात आला. निर्धारित काळ संपल्यानंतर त्यातील बहुतांश नागरिक टप्प्या-टप्प्याने लसीचा दुसरा डाेस घेण्यास केंद्रावर येऊ लागले. मात्र, त्यातील २,५९१ नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला. त्यामुळे उर्वरित ९,८९१ नागरिक लस घेण्यासाठी केंद्रावर येत आहेत. त्यातच १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आल्याने केंद्रावर नागरिकांचा ओघ वाढला.
लसींचा कमी साठा प्राप्त हाेत असल्याने अनेकांना राेज परत जावे लागत असल्याने तरुण मंडळी आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर राेष व्यक्त करीत आहेत. काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत खापरखेडा परिसरात रुग्णांची संख्या वाढली हाेती. त्यामुळे लस घेण्याबाबत बहुतांश मंडळी सकारात्मक विचार करायला लागली. त्यातच लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांना नवीन समस्येला सामाेरे जावे लागत आहे. ही समस्या साेडविण्यासाठी चिचाेली आराेग्य केंद्राला राेज पुरेशा लसींचा साठा पुरविण्यात यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य बंडू आवळे, सरपंच पवन धुर्वे, दिलीप ढगे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.