नागपूर बोर्डाचे दहावीच्या निकालाचे ९९ टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:45+5:302021-07-15T04:06:45+5:30
पुनर्परीक्षार्थ्यांमुळे आल्या त्रुटी : विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष मंगेश व्यवहारे नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे काम ...
पुनर्परीक्षार्थ्यांमुळे आल्या त्रुटी : विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष
मंगेश व्यवहारे
नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे काम शाळांनीच केले आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने मूल्यांकनासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी मूल्यांकन केले आहे. नियमित विद्यार्थ्यांबरोबरच मूल्यांकनाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, मंडळाने निकालाच्या प्रक्रियेसाठी राज्य शिक्षण मंडळाकडे डाटा पाठविला आहे.
शाळांना मूल्यांकनासाठी ११ ते ३० जून हा कालावधी देण्यात आला होता. मूल्यांकन करताना शाळांची जबाबदारी, विषयनिहाय शिक्षकांचे कर्तव्य, प्रत्यक्ष निकाल, निकाल समिती आणि मुख्याध्यापकांचे कर्तव्य, आदी बाबी राज्य शिक्षण मंडळाने निश्चित केल्या होत्या. नववी आणि दहावीच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण द्यायचे होते. निकषनिहाय गुण एकत्रित केल्यानंतर मुख्याध्यापकांना मंडळाने प्रसिद्ध केलेल्या लिंकद्वारे ते ऑनलाईन भरायचे होते. नियमित विद्यार्थ्यांची ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले असले तरी काही शाळांना मूल्यांकन करताना काही त्रुटी भेडसावल्या; पण बोर्डाकडून केलेल्या मार्गदर्शनामुळे त्या त्रुटी दूर करण्यात आल्या. पुनर्परीक्षार्थ्यांच्या मूल्यांकनात आलेल्या त्रुटी बोर्ड अजूनही सोडवीत आहे. त्यामुळे निकाल घोषित करण्यास वेळ लागतो आहे. परिणामी विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
- नागपूर विभागीय मंडळातील दहावीचे परीक्षार्थी
एकूण परीक्षार्थी - १,५६,५६२
पुनर्परीक्षार्थी - ५८९८
- ६९० पुनर्परीक्षार्थ्यांच्या त्रुटी काढण्याचे काम सुरू
दहावीच्या परीक्षेत ५८९८ विद्यार्थी हे पुनर्परीक्षार्थी होते. यातील १३८२ विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनात बोर्डाला त्रुटी आढळल्या. शाळेने या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना स्कूल रेकॉर्डनुसार मूल्यांकन केले नव्हते. यातील ६९२ विद्यार्थ्यांच्या त्रुटी बोर्डाने काढल्या आहेत. हा प्रकार सर्वच विभागीय मंडळांना भेडसावत आहे.
- शाळांनी केलेल्या मूल्यांकनात गणित आणि विज्ञान विषयाचे गुणदान करताना झालेल्या दुर्लक्षामुळे काही अडचणी आल्या. बहुतांश शाळांनी योग्यच गुणदान केले. पण पुनर्परीक्षार्थ्यांच्या बाबतीत गुणदान करताना भरपूर त्रुटी आढळल्या. त्या दूर करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेशी संपर्क करून त्रुटी सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही काही शाळा त्रुटी पूर्ण करू शकल्या नाहीत; पण नियमित विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, ते राज्य शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आले आहे.
- माधुरी सावरकर, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर