९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन; नागपुरी स्वादाची कलावंतांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:45 AM2019-02-25T11:45:18+5:302019-02-25T11:46:51+5:30
भोजनाचे उत्तम नियोजन आणि रात्री उशिरापर्यंत सहज उपलब्ध होत असलेली मेजवानीमुळे नागपुरात नाट्य संमेलनासाठी आलेला रसिक, नाट्य कलावंत, सिने कलावंतांना नागपुरी स्वादाची भुरळ घालून गेला.
मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाट्य संमेलन असो, की साहित्य संमेलन, भोजनावरून हमखास हे संमेलन वादातीत ठरतात. पण नागपुरात सुरू असलेले ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन त्याला अपवाद ठरले आहे. भोजनाचे उत्तम नियोजन आणि रात्री उशिरापर्यंत सहज उपलब्ध होत असलेली मेजवानीमुळे नागपुरात नाट्य संमेलनासाठी आलेला रसिक, नाट्य कलावंत, सिने कलावंतांना नागपुरी स्वादाची भुरळ घालून गेला. गेल्या तीन दिवसात हजारो रसिक व कलावंतांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, परत चहा नाश्ता आणि रात्रीचे जेवण असे भोजनाचे नियोजन ठेवले होते. नाट्य संमेलनाच्या भोजन समितीने या भोजनाचे उत्कृ ष्ट नियोजन केले होते. नागपुरी ठेचा, मिसळ भाकर, पुरणपोळी, पाटोडी, दाळकांदा, मुगाचा शिरा, गुलाबजाम, मसाले भात असा बेत दररोजच्या जेवणात आहे. सकाळी ८ वाजतापासून सुरू होणारी ही खानावळ रात्री उशिरापर्यंत सुरू असे. भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर त्यांनी पहाटे ४ वाजता जेवणाची मागणी केली. तेव्हा भोजन समितीच्या सदस्यांनी त्यांना भोजन उपलब्ध करून दिले. नाट्य संमेलनासाठी आलेले सिने कलावंतामध्ये अलका कुबल, मोहन जोशी, ऐश्वर्या नारकर यांच्यासह अनेकांनी भोजनाचा आस्वाद येथे घेतला. प्रत्येकाच्या तोंडातून नागपुरी स्वाद आणि भोजनाच्या आयोजनाची तारीफच झाली. रसिकजनही नाट्य संमेलनाचा आस्वाद घेतानाच भोजनाचाही मनसोक्त आस्वाद घेत होते.
नाट्य संमेलनाच्या नागपूर शाखेने भोजन समिती तयार केली होती. यात समिती प्रमुखासह ५० सदस्यांची नियुक्ती केली होती. तीन शिफ्टमध्ये हे काम होत होते. विशेष म्हणजे सभागृह परिसरात किचनला परवानगी नव्हती. त्यामुळे दोन किलोमीटरवरून अन्न आणावे लागत होते. अशातही रात्री उशिरापर्यंत कलावंतांनी मागणी केली तेव्हा त्यांना भोजन उपलब्ध करून दिले. समितीने येणाऱ्या प्रत्येकाला तृप्त करून सोडले. विशेष म्हणजे प्रत्येकानेच भोजनाची तारीफ केली.
प्रवीण देशकर, भोजन समिती प्रमुख