९९ वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन; बाल रंगभूमीची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:20 AM2019-02-25T11:20:09+5:302019-02-25T11:23:08+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील रंगभूमीशी जुळलेल्या सर्व प्रकारच्या नाटकांचा व कलाप्रकारांचा अंतर्भाव करण्याचा दावा करणाऱ्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना बाल रंगभूमीचा मात्र विसर पडला.
निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील रंगभूमीशी जुळलेल्या सर्व प्रकारच्या नाटकांचा व कलाप्रकारांचा अंतर्भाव करण्याचा दावा करणाऱ्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना बाल रंगभूमीचा मात्र विसर पडला. संपूर्ण संमेलनात बाल रंगभूमीचा कुठेही अंतर्भाव झाला नाही. बाल नाटक तर सोडाच पण कुठला परिसंवाद किंवा बालनाट्याची चर्चाही संमेलनात दिसली नाही. यामुळे नाटकांच्या या मेळाव्यात बाल रंगभूमीची अवहेलना झाल्याची खंत बाल नाटककारांनी व्यक्त केली.
प्रौढ रंगभूमी हे नाट्य क्षेत्रातले हायस्कूल असेल तर बाल रंगभमी ही प्राथमिक शाळा आहे. याच शाळेत प्रवेश घेतल्यानंतर नाट्य कलावंतांना हायस्कूलमध्ये प्रवेश मिळतो. म्हणूनच बाल रंगभूमी ही प्रौढ रंगभूमीच्या यशाची शिडी आहे असेही म्हणायला हरकत नाही. कारण उद्याचा सुजाण कलावंत आणि प्रेक्षक घडवायचा असेल तर बाल रंगभूमीला जिवंत ठेवणे, प्रोत्साहन देणे तितकेच आवश्यक आहे. मग महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात मोठ्या नाटकांच्या मेळाव्यात बाल नाटकांना स्थान देण्यात येऊ नये, यापेक्षा दुसरी शोकांतिका ती काय? आयोजनातील ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकांपासून सुरुवात केल्यास नऊ एकांकिका, दोन झाडीपट्टीची नाटके, दोन परिसंवाद, एकपात्री प्रयोग, रघुवीर खेडकरांचा तमाशा, तीन इतर नाटके, स्वरानंदनवन हा वाद्यवृंदांचा कार्यक्रम, असे काही कार्यक्रम संमेलनात आहेत. संमेलनात ‘गीत रामायण’ हा बाल वाद्यवृंदांचा कार्यक्रम आहे. परंतू वाद्याच्या समावेशाने बाल नाटकांचा अंतर्भाव झाला असे म्हणता येणार नाही. ‘संमेलनाची वारी’ या विशेष कार्यक्रमात बाल कलावंतांचा सहभाग होता, मात्र तो नाच गाण्यापुरताच. यातून बाल नाटकांना प्रोत्साहन कसे मिळेल हा प्रश्नच आहे. बाल नाटक म्हणजे बालकांनीच सादर केलेले नाटक असा होत नाही तर बालकांसाठी, त्यांच्यातील भावना, अभिरुची व प्रतिभेला प्रोत्साहन देणारे सादरीकरण म्हणजे बाल नाट्य होय. पण असे झाले नाही. ८५ च्या काळात बीड येथे झालेल्या नाट्य संमेलनात बाल नाटकांचा समावेश करण्यात आला होता व तेव्हापासून सातत्याने एकतरी बाल नाटक राहील याची तजवीज करण्यात येत होती. मात्र नागपूरच्या संमेलनात हा प्रवास पुन्हा खंडित झाल्याचे बोलले जात आहे.
संमेलनात आणि एकु णच रंगभूमीवर सध्या कार्यरत असलेले ७० टक्के कलावंत हे बाल रंगभूमीतूनच पुढे आले आहेत. मात्र तरीही नाट्य संमेलनात बालनाट्याला स्थान देण्यात आले नाही, याला काय म्हणावे?
बाल नाटकांना संधी मिळावी यासाठी अ.भा. मराठी नाट्य परिषदेकडे अर्जही केला होता. त्यामुळे बाल कलावंतांमध्येही नाटकांचे, नाट्य संमेलनाचे आकर्षण निर्माण होईल, ही बाब अनेकांच्या लक्षात आणून दिली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. माझे नाटक झाले नाही याची खंत नाही, पण महाराष्ट्रातून कुणाचेही एकतरी बाल नाटक संमेलनात असावे, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपूर्ण राहिल्याची खंत आहे.
- संजय पेंडसे,
बाल नाटककार