९९ टक्के तरुण संपूर्ण लसीकरणापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:07 AM2021-07-27T04:07:53+5:302021-07-27T04:07:53+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तरुणांचे बाधित होण्याचे व मृत्यूचेही प्रमाण वाढले. संभाव्य तिसऱ्या ...
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तरुणांचे बाधित होण्याचे व मृत्यूचेही प्रमाण वाढले. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका तरुण व लहान मुलांना असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरणासाठी शासन उदासीन असल्याचे चित्र आहे. या वयोगटात आतापर्यंत पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण २५ टक्के, तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ०.६६ आहे. ९९ टक्के तरुण संपूर्ण लसीकरणापासून अद्यापही दूर आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग ज्येष्ठांना अधिक होतो, असा सर्वसामान्यांचा समज दुसऱ्या लाटेने बदलला. या लाटेत १८ ते ४४ वयोगटांतील रुग्णांची संख्या सुमारे ४० टक्क्यांच्यावर गेली. मृत्यूचा दरही जवळपास ३० टक्क्यांहून अधिक होता. संभाव्य तिसऱ्या लाटेत याचे प्रमाण रोखण्यासाठी १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु नागपूर शहर आणि ग्रामीणला आवश्यकतेनुसार लसीचा साठाच उपलब्ध होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका याच वयोगटाला बसत आहे. जेमतेम साठ्यामुळे केंद्रावरील गर्दी टाळण्यासठी तरुणांना वगळले जात आहे. परिणामी, अपेक्षेपेक्षा कमी लसीकरण होत असल्याचे वास्तव आहे.
-मेडिकलमध्ये कोरोनामुळे ६०३ तरुणांचा मृत्यू
१ मे २०२० ते १६ जुलै २०२१ या दरम्यान एकट्या मेडिकलमध्ये २० ते ४० या वयोगटात ६०३ तरुणांचे बळी गेले आहेत. धक्कादायक म्हणजे, मार्च महिन्यात मेडिकलमध्ये या वयोगटात ५३, तर एप्रिलमध्ये १७१ तरुणांचे बळी गेले.
-२१ लाखांपैकी १४ हजार तरुणांनी घेतला दुसरा डोस
उपलब्ध माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटांतील लोकसंख्या २१ लाख ४० हजार ७०२ आहे. यातील २५.१० टक्के म्हणजे, ५ लाख ३७ हजार ३३१ तरुणांनी पहिला, तर ०.६६ टक्के म्हणजे, १४ हजार ३३२ तरुणांनी दुसरा डोस घेतला आहे. ही मोठी तफावत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
-४५ वर्षांवरील वयोगटांत २८ टक्के लोकांनाच संपूर्ण लस
४५ व त्यापेक्षा अधिक वयोगट कोरोनासाठी सर्वांत धोकादायक म्हणून पाहिले जाते. नागपूर जिल्ह्यात या वयोगटातील लोकांची संख्या १५ लाख ८१ हजार ८०० आहे. यातील ५९.३४ टक्के म्हणजे, ९ लाख ३८ हजार ५७० लोकांनी पहिला, तर २८ टक्के म्हणजे ४ लाख ४३ हजार ८६२ लोकांनी दुसरा डोस घेतला. यामुळे या वयोगटातील लोकांनाही संभाव्य लाटेचा मोठा धोका आहे.
-१८ ते ४४ वयोगट
::लोकसंख्या : २१,४०,७०२
:: पहिला डोस : ५,३७,३३१
:: दुसरा डोस : १४,३३२
-४५ वर्षे व त्यापुढील वयोगट
:: लोकसंख्या : १५,८१,८००
:: पहिला डोस : ९,३८,५७०
:: दुसरा डोस :४,४३,८६२