कोरोना काळात देशातील बँकांमध्ये ९९ हजार कोटींचे घोटाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 01:50 AM2021-05-05T01:50:55+5:302021-05-05T07:25:02+5:30
माहिती अधिकारातून उघड : बँकांविरोधात ३ लाखांहून अधिक तक्रारी
नागपूर : देशातील विविध बँका व वित्त संस्थांमध्ये मागील आर्थिक वर्षातील पहिल्या आठच महिन्यांत थोडेथोडके नव्हे, तर ६३ हजाराहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्याची रक्कम ही ९९ हजार कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडे यासंदर्भात विचारणा केली होती. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत देशभरातील बँकांमध्ये एकूण किती घोटाळे झाले, यात किती रकमेचा समावेश होता, किती घोटाळ्यात बँक कर्मचाऱ्यांचा समावेश होता, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.
आरबीआयकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार, १ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या आठ महिन्यांच्या कालावधीत विविध बँका व वित्त संस्थांमध्ये ६३ हजार ३४५ घोटाळे उघडकीस आले. यात ९९ हजार ८६३ कोटींच्या निधीचा समावेश होता. ग्राहकांकडून बँकांच्या कारभाराविरोधात तक्रार करण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. वर्षभरात विविध बँकांविरोधात बँकिंग लोकपाल कार्यालयाकडे ३ लाख २० हजार ७०३ तक्रारी झाल्या, तर ग्राहक संरक्षण विभागाकडे ३७ हजार १३४ तक्रारी करण्यात आल्या. बँकांमधील गैरव्यवहारांमध्ये तेथील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असतोच. मात्र, त्यात किती कर्मचारी सापडले याची माहिती उपलब्ध झाली नाही.
बँकांच्या २,३९९ शाखा बंद
१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत देशभरातील काही बँकांचे विलिनीकरण झाले. आर्थिक वर्षात देशभरातील विविध बँकांच्या २,३९९ शाखा बंद झाल्या.
कर्मचाऱ्यांवरील कारवाईची माहितीच नाही
याअगोदरच्या आर्थिक वर्षांत बँकांमधील गैरव्यवहारात तेथील काही कर्मचाऱ्यांचादेखील समावेश होता. परंतु एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत किती कर्मचारी सहभागी होते व त्यांच्यावर नेमकी कुठली कारवाई करण्यात आली, याची कुठलीही माहिती ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडे उपलब्ध नाही