९९ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन : हे काही ‘सही’ नाही बुवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 09:19 PM2019-02-23T21:19:37+5:302019-02-23T21:20:55+5:30
९९ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे दिमाखात नागपूर शहरात शनिवारी उद्घाटन झाले खरे, मात्र दिखावा करण्याच्या नादात नागपूरच्या नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्यसंमेलनाला आलेल्या कलाकारांची मात्र फरफट केली आहे. आणि याचा मोठा फटका बसला दस्तुरखुद्द सुपरस्टार भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकांच्या कलाकारांनाच. नागपूरात प्रवेश केल्यावर सहीच्या कलाकारांना ३ तास हॉटेल मिळण्यासाठी तडफड करावी लागली.
अजय परचुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ९९ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे दिमाखात नागपूर शहरात शनिवारी उद्घाटन झाले खरे, मात्र दिखावा करण्याच्या नादात नागपूरच्या नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्यसंमेलनाला आलेल्या कलाकारांची मात्र फरफट केली आहे. आणि याचा मोठा फटका बसला दस्तुरखुद्द सुपरस्टार भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकांच्या कलाकारांनाच. नागपूरात प्रवेश केल्यावर सहीच्या कलाकारांना ३ तास हॉटेल मिळण्यासाठी तडफड करावी लागली. विशेष म्हणजे भरत जाधव हे खुद्द नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळावर असूनही त्यांच्या टीमला अशी वागणूक मिळाली .सर्व नागपूरांचे लक्ष लागलेल्या भरत जाधव यांच्या पुन्हा सही रे सही नाटकाचा प्रयोग शनिवारी रात्री १० वाजता नागपूरच्या सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यासाठी सही रे सहीची टीमची बस नाटकाच्या सेटसह शुक्रवारी मुंबईतून निघाली. सर्व कलाकार,बॅकस्टेज आर्टिस्ट अश्या जवळपास २० जणांच्या टीमने तब्बल २४ तास बसने प्रवास केला. या प्रवासाने हे कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी पुरती दमली होती. शुक्रवारी संध्याताळी ७ वाजता ही टीम नागपूरमध्ये दाखल झाली. १० वाजताच्या प्रयोगाच्या आधी हॉटेलवर जाऊन तयारी करून पुन्हा नाट्यगृहात येण्याचा त्यांचा मनोदय होता. मात्र या कलाकारांची व्यवस्था करण्यासाठी नागपूरच्या नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नेमलेल्या माणसांनी या टीमला हॉटेलच्या नावावर नागपूरचं ३ तास दर्शन घडवलं. यात या कलाकारांना नाहक त्रास झाला.
कोणतंही हॉटेल मिळेना आणि त्यात १० वाजता प्रयोग म्हणून ही सर्व कलाकारमंडळी बिना आंघोळीचे कलेच्या प्रेमापोटी सुरेश भट सभागृहात पोहचले. तिथेही या कलाकारांना चहा,कॉफी, न्याहरीची सोय करण्यासाठी प्रचंड त्रास झाला. परिषदेचे पदाधिकारी उद्घाटनाच्या कार्यक्रमात पुढे पुढे करण्यासाठी निघून गेल्याने या कलाकारांना सापत्न वागणूक मिळाली. भरत जाधव यांना ही बाब कळताच त्यांनी नागपूरच्या परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तेव्हा कुठे जाऊन या कलाकारांना सुरेश भट सभागृहाच्या ग्रीन रूममध्ये चहा,न्याहरीची सोय करण्यात आली. कलाकारांच्या या अपमानाबद्दल नागपूरच्या परिषदेचे वाभाडे निघाले आहेत. नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळावर असलेल्या भरत जाधव यांच्या टीमसोबत जर अशी अपमानास्पद वागणूक झाली असेल. तर महाराष्ट्रभरातून एकांकिका, नाटक करायला येणाºया रंगकर्मींची व्यवस्था याहीपेक्षा बिकट असल्याची भावना संमेलस्थळी बोलली जात आहे. या प्रकरणी भरत जाधव आणि त्यांच्या टीमची नाट्यपरिषदेने माफी मागावी अशी मागणी संमेलस्थळी जमलेल्या रंगकर्मींनी केली आहे.
माझ्या कलाकारांचा अपमान हा माझा अपमान
माझी सहीची टीम हे माझं दुसरं कुटुंब आहे. २४ तास प्रवास करून ही मंडळी तासभर आपला थकवा घालवण्यासाठी हॉटेलमध्ये जाणार होती. मात्र परिषदेने त्यांना नागपूरची नाहक सफर घडवली. दुसरीकडे त्यांना सभागृहाच्या प्रसाधनगृहातच आंघोळ करा असं सांगण्यात आलं. हे जेव्हा मला माझ्या सहकलाकारांनी सांगितलं तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं. संमेलन हे कलाकारांचं असतं. आणि त्यांना जर अशी वागणूक मिळत असेल तर हे मी कदापी सहन करणार नाही.. माझ्या हस्तेक्षेपानंतर कलाकारांना मध्यरात्री जेवणाची सोय करण्यात आली. पण मिळालेली अपमानास्पद वागणूक निश्चितच दुर्देवी आहे.
भरत जाधव - अभिनेता
पुन्हा सही रे सही नाटक बघण्याची नागपूरकरांना सुवर्ण संधी मिळाल्याने .शनिवारी रात्री १० वाजता सुरेश भट सभागृह तुडुंब भरलं होतं. सभागृहात २२०० लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. मात्र नागपूरच्या स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम संपण्यास ११ वाजून गेले. त्यानंतर नाटकाला सुरवात झाली आणि मध्यरात्री उशिरापर्यंत नाटकाचा प्रयोग सुरूच होता. नागपूरच्या बाहेरूनही प्रेक्षक मंडळी आर्वजून हे नाटक पाहायला आली होती. मात्र मध्यरात्री १ नंतर सभागृहातील काही व्यक्ती झोपलेल्या आढळून आल्या.