९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन : ... नाही तर रंग पुन्हा सुना सुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:02 AM2019-02-24T01:02:36+5:302019-02-24T01:03:46+5:30
काळाची पावले ओळखून बदल केला नाही तर कोणतीही कला टिकत नाही. तमाशा या पारंपरिक लोककलेबाबत असेच झाले का ही भीती व्यक्त होत असताना रघुवीर खेडकर या हरहुन्नरी कलावंताने या तमाशात जीव ओतला. तमाशात नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करून नव्या रूपात घडविले. त्यांच्या या तुफान गाजलेल्या तमाशाची झलक शनिवारी रसिकांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनुभवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काळाची पावले ओळखून बदल केला नाही तर कोणतीही कला टिकत नाही. तमाशा या पारंपरिक लोककलेबाबत असेच झाले का ही भीती व्यक्त होत असताना रघुवीर खेडकर या हरहुन्नरी कलावंताने या तमाशात जीव ओतला. तमाशात नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करून नव्या रूपात घडविले. त्यांच्या या तुफान गाजलेल्या तमाशाची झलक शनिवारी रसिकांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनुभवली.
पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंच, रेशीमबाग मैदान येथे रघुवीर खेडकर व कलावंतांचा तमाशा सादर झाला. आई कांताबाई सातारकर यांच्या प्रेरणेतून तमाशा कलेत आलेल्या खेडकरांच्या संचात १३० पेक्षा अधिक कलावंत सहभागी आहेत. पारंपरिक तमाशात दिसणारे गण, गवळण आणि वगनाट्य येथेही होते, मात्र त्यांचे सादरीकरण नव्या रूपात दिसले. गण अर्थात ईश्वर स्तवनाने या तमाशाला सुरुवात झाली. ‘आधी गणाला रणी आणा, नाही तर रंग पुन्हा सुना सुना...’ या स्तवनाने नृत्याविष्कार करीत रसिकांच्या सेवेसाठी ईश्वराची साथ आणि आशीर्वाद राहण्याची कामना केली. तमाशा म्हटला की गवळण आलीच. त्यानुसार सजूनधजून मथुरेच्या बाजारी निघालेल्या गवळणी पुढे आल्या व एकेक करीत त्यांनी ओळखही दिली. अर्थात ही ओळख करून देण्यात ‘मावशी’ हे पारंपरिक पात्र पुढे होतेच. यादरम्यान कलावंतांनी २१ व्या शतकातील आधुनिक कृष्णलीला सादर केल्या, ज्यात गवळणींच्या मोहक नृत्याची झलक बघायला मिळाली. ‘गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा...’ हे दमदार नृत्य कलावंतांनी सादर केले. पुढे कलावंतांनी वगनाट्य सादर केले. मात्र या नाट्यात नेहमी तमाशात सादर होणारे कथानक नव्हते तर काही लोकप्रिय पारंपरिक आख्यायिका व आजच्या काळातील प्रसंगाचे चित्रण होते. महिषासूर वधाचा प्रसंग तसेच शिवाजी महाराज, भगतसिंग यांचे जीवन दर्शन आणि भारतीय जवानांची गाथा कलावंतांनी मांडली. पुढे आधुनिक रंगाचा हा तमाशा उत्तरोत्तर बहरत गेला. तमाशातील कलावंतांनी अभिनयाने, विनोदाने, गाण्याने, नृत्याने प्रेक्षकांची करमणूक केली.