९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शुक्रवारपासून नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 08:13 PM2019-02-21T20:13:40+5:302019-02-21T20:20:41+5:30

माय मराठीच्या नाटकांचा मान आणि सन्मानाचा सर्वात मोठा सोहळा उद्या शुक्रवारपासून नागपुरात रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतकापूर्वीच्या म्हणजे ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाला आजपासून राज्याच्या उपराजधानीत सुरुवात होणार असून नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य व चित्रपट कलावंतांची मांदियाळी यानिमित्ताने येथे लागणार आहे. २२ रोजी दुपारी निघणाऱ्या नाट्य दिंडीनंतर ज्येष्ठ नाट्यकर्मी महेश एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

99th All India Marathi Natya Sammelan from Friday at Nagpur | ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शुक्रवारपासून नागपुरात

९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शुक्रवारपासून नागपुरात

Next
ठळक मुद्देनाट्यकर्मी, नाट्य, चित्रपट कलावंतांची मांदियाळीनाट्य दिंडीनंतर सायंकाळी उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माय मराठीच्यानाटकांचा मान आणि सन्मानाचा सर्वात मोठा सोहळा उद्या शुक्रवारपासून नागपुरात रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतकापूर्वीच्या म्हणजे ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाला आजपासून राज्याच्या उपराजधानीत सुरुवात होणार असून नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य व चित्रपट कलावंतांची मांदियाळी यानिमित्ताने येथे लागणार आहे. २२ रोजी दुपारी निघणाऱ्या नाट्य दिंडीनंतर ज्येष्ठ नाट्यकर्मी महेश एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
२२ ते २५ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या या नाट्य संमेलनाच्या रेशीमबाग परिसराला राम गणेश गडकरी परिसर असे नाव देण्यात आले आहे तर मुख्य रंगमंचाला पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे नाव देण्यात आले आहे. संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच संमेलनाचे थीम साँग तयार करण्यात आले आहे. २२ रोजी शिवाजी पुतळा महाल येथून दुपारी ३ वाजता नाट्य दिंडीला सुरुवात होणार आहे. यामध्ये नागपूरच्या ऐतिहासिक वारशाची झलक दिसणार आहे. नाट्य दिंडी राम गणेश गडकरी परिसरात पोहचल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता महेश एलकुंचवार यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच संमेलन अध्यक्ष कीर्ती शिलेदार व ९९ व्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी हे उपस्थित राहणार आहेत. येणारे चारही दिवस दर्जेदार नाटक, एकांकिका, परिसंवाद, चर्चासत्र असे भरगच्च कार्यक्रम चालणार आहेत.
सलग ६० तास चालणार संमेलन
२२ फेब्रुवारीला सायंकाळी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर लगेच संमेलनातील कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, २५ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत नाट्यनगरीत सलग कार्यक्रम रंगणार आहेत. म्हणजेच दिवस-रात्र कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
हे राहणार आकर्षण
संमेलनाच्या पहिल्या दिवशी अभिनेता भरत जाधव यांच्या अफलातून अभिनयाने गाजलेले ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाने नाट्य संमेलनाची आकर्षक मांडणी सुरू होणार आहे. मध्यरात्री १ वाजता झाडीपट्टीचे ‘आक्रोश’ हे नाटक, तर २३ रोजी सकाळी ९ वाजता बहुजन रंगभूमीची ‘गटार’ ही एकांकिका सादर होणार आहे. सायंकाळी ५ वाजता ‘नाटक : जगण्याची समृद्ध अडगळ’ या विषयावर परिसंवाद तर ६ वाजता ‘रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर’ यांचा लोकनाट्य तमाशा, हेही या संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. २४ रोजी मध्यरात्री १ वाजता ‘अस्सा नवरा नको ग बाई’ हे गाजलेले नाटक सादर होईल. संमेलनात एकूण सहा एकांकिका, परिसंवाद, चर्चासत्र, बाल वाद्यवृंदांचे ‘गीत रामायण’ असे विविध कार्यक्रम संमेलनादरम्यान सादर होतील.

 

Web Title: 99th All India Marathi Natya Sammelan from Friday at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.