९९ वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन; माहितीपटावर रंगली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:07 AM2019-02-25T11:07:04+5:302019-02-25T11:09:09+5:30

नाट्यसंमेलनाच्या ९९ वर्षांच्या इतिहासात कधीही न घडलेला असा माहितीपूर्ण कार्यक्रम रविवारी सुरेश भट सभागृहात तुडुंब भरलेल्या रसिक प्रेक्षकांच्या समोर याची देही याची डोळा घडला.

99yrs Marathi Natya Sammelanan; Discussion on the documentary | ९९ वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन; माहितीपटावर रंगली चर्चा

९९ वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन; माहितीपटावर रंगली चर्चा

Next
ठळक मुद्देअविस्मरणीय संमेलनाची वारीकलाकारांच्या बहारदार सलामीला भरभरून दाद

अजय परचुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाट्यसंमेलनाच्या ९९ वर्षांच्या इतिहासात कधीही न घडलेला असा माहितीपूर्ण कार्यक्रम रविवारी सुरेश भट सभागृहात तुडुंब भरलेल्या रसिक प्रेक्षकांच्या समोर याची देही याची डोळा घडला. नाट्य संमेलनाच्या इतिहासातील आतापर्यंतच्या ९९ नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांचा माहितीपट तब्बल २०० कलाकारांनी २ तासात रसिकांसमोर अगदी माहितीपूर्णरीत्या उलगडला. यावेळी प्रेक्षागृहात उपस्थित असलेल्या काही माजी संमेलनाध्यक्षांनीही नागपूरकर कलाकारांच्या या बहारदार सलामीला भरभरून दाद दिली. त्यामुळे रविवारी नाट्यसंमेलन नगरीत आतापर्यंतच्या नाट्य संमेलनाध्यक्षांच्या बाबतीतील या महत्त्वपूर्ण माहितीपटावर चर्चा रंगली होती.
२८ आॅगस्ट १९०५ ला मुंबईमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पहिले नाट्य संमेलन रंगले होते. १९०५ ते सध्या २०१९ मध्ये सुरू असलेल्या ९९ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांची माहिती रसिकांना करून देण्यासाठी देवेंद्र बेलनकर या नागपूरच्या नाट्यकर्मीने आपल्या आयडियाच्या कल्पनेतून या दिग्गज ९९ संमेलनाध्यक्षांचा जीवनपट अडीच तासांच्या कार्यक्रमात रसिकांसमोर अगदी कल्पकतेने मांडला. मागे स्क्रीनवर प्रत्येक अध्यक्षाचे नाव, संमेलन किती साली आणि कुठे झालं, त्या संमेलनाची तारीख अगदी बिनचूक देण्यात आली होती. त्याचबरोबर तीन रंगकर्मींच्या माध्यमातून एक-एक अध्यक्षांची ओळख रसिकप्रेक्षकांना त्यांच्या गाण्यातून, प्रहसनातून, त्यांच्या नाटकातील उताऱ्यातून आणि त्यांच्याविषयीच्या माहितीतून देण्यात येत होती. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर झालेल्या नाट्य संमेलनात कसे कसे बदल होत गेले याचे अप्रतिम विवेचन हे या संमेलनाच्या वारीचं विशेष आकर्षण होते.
यावेळी प्रेक्षागृहात कीर्ती शिलेदार,जयंत सावरकर, प्रेमानंद गज्वी हे आजी-माजी संमेलनाध्यक्षही उपस्थित होते. त्यांनीही शेवटी रंगमंचावर येत या २०० कलाकारांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी नरेश गडेकर, आसावरी तिडके, रूपाली मोरे या नागपूरच्या रंगकर्मींनी विशेष मेहनत घेतली.

डॉ. विलास उजवणेंच्या नटसम्राटने नागपूरकरांचे डोळे पाणावले
मालिका, सिनेमा आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे हे पक्के नागपूरकर. मात्र गेली काही वर्ष प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी रंगमंचावर काम करणं जवळपास बंद केलं होतं. मात्र आपल्या गावात ९९ वे नाट्यसंमेलन इतक्या दिमाखदार पध्दतीने सुरू असताना उजवणे कसे मागे राहतील. आपल्या रंगभूमीवरच्या प्रेमापोटी तब्येत बरी नसतानाही डॉ. विलास उजवणे यांनी नटसम्राटमधील टू बी आॅर नॉट टू बी चा प्रसंग अगदी बहारदार रंगवला आणि आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहून नागपूरकरांचे डोळे आनंदाने भरून आले. त्यांच्या अभिनयाला भरभरून दाद देताना नागपूरकरांनी जवळपास पाच मिनिटं टाळ्यांचा कडकडाट केला.

९९ संमेलनाध्यक्षांचा उलगडला जीवनपट
वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, ग. दि. माडगूळकर, नाना पाटेकर, भक्ती बर्वे, पुरुषोत्तम दारव्हेकर, न. चि. केळकर, दादासाहेब खापर्डे, बालगंधर्व अशा दिग्गज ९९ संमेलनाध्यक्षांचा जीवनपट आणि कार्यकाळ नागपूर रंगकर्मींनी अवघ्या अडीच तासात उलगडला. आचार्य अत्रेंच्या समग्र लेखणीतून उतरलेल्या अजरामर मोरूची मावशी नाटकातील एका प्रहसनाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मावशीच्या भूमिकेतील राजेश चिटणीस या रंगकर्मीला टांग टिंग टिंगावर नाचताना पाहून प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध रंगकर्मीने हिरीरीने भाग घेऊन सर्व दिग्गज नाट्य संमेलानध्यक्षांच्या कार्याला एक प्रकारे मानाचा मुजराच केला. १५ आॅगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. या वाक्यानंतर प्रेक्षागृहातून भारताचा तिरंगा झेडा हाती घेत लहानग्यांनी वंदे मातरम् म्हणत रंगमंचावर केलेला प्रवेश हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरलं. या २०० कलाकारांमध्ये गंधर्व गडेकर हा फक्त ३ वर्षांच्या रंगकर्मीनेही आपल्या कलेची छाप सोडली हे विशेष.

Web Title: 99yrs Marathi Natya Sammelanan; Discussion on the documentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक