पतंगाच्या नादात बसला विजेचा शॉक, १० वर्षीय मुलाचा कापावा लागला पाय
By सुमेध वाघमार | Published: January 12, 2024 08:47 PM2024-01-12T20:47:07+5:302024-01-12T20:47:28+5:30
मेडिकलमध्ये मृत्यूशी संघर्ष : उच्च दाबाचा विजेचा शॉकने ४५ टक्के जळाला
नागपूर : नायलॉनच्या मांजामुळे गळे कापल्याचा घटना समोर येत असताना पंतगाच्या नादात एका दहा वर्षीय मुलाला उच्च दाबाचा विजेचा शॉक लागल्याने ४५ टक्के जळाला. यामध्ये त्याचा उजवा पाय कापावा लागला. त्याची प्रकृती चिंताजनक असून मेडिकलमध्ये मृत्यूशी संघर्ष करीत आहे.
समता नगर येथील रहिवासी असलेला चंदू (बदललेले नाव) १० जानेवारी रोजी सायंकाळी पतंग उडवित होता. प्राप्त माहितीनुसार, अचानक त्याचा पतंग उच्च दाबाचा विद्युत लाईनवर अडकला. तो पतंग काढण्याचा प्रयत्नात असताना उच्च दाबाबा विजेचा शॉक बसला. हा शॉक इतका भयानक होता काही क्षणातच तो ४५ टक्के जळाला. त्याचा उजव्या पायाची बोटेच उडाली. त्याचे दोन्ही हात आणि डावा पायसुद्धा जळाला.
अशा स्थितीत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अक्षय सज्जनवार यांनी रुग्णाकडे धाव घेतली. प्लास्टिक सर्जन डॉ. नेहा गुप्ता व पेडियाट्रिक्स सर्जन डॉ. राजेंद्र सावजी यांनी उपचाराला सुरूवात केली.
उजवा पाय नीळा पडला होता
मेडिकलचा प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. पाटील यांनी सांगितले, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचा उजवा पाय नीळा पडल्याने गुरुवारी गुडघ्याच्यावरील पाय कापावा लागला. त्याचा उजव्या हाताचा खांद्याखालचा भागही नीळा पडल्याने तो कापावा लागला. त्याचा छातीपासून डावा हात व पाय जळाला आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
विजेचा तारा, खांबापासून दूर राहा
विजेचा तारा किंवा खांबाला अडकलेली पंतग काढू नका. त्याचापासून दूर राहा. धोका होऊन जीवावर बेतू शकते. नायलॉनचा मांजाने पतंग उडवू नका. यामुळे तुमच्यासह इतरांचे गळे कापून जीव धोक्यात येऊ शकतो. पतंगाच्या नादात जळालेल्या १० वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर वरीष्ठ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. त्याच्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया व औषधेपचार पूर्णपणे नि:शुल्क केला जात आहे.
- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक मेडकिल