१४ महिन्यांच्या मुलीला हृदयविकाराचे झटके! विमानाचे नागपूरला इमरजन्सी लॅँडिंग

By मोरेश्वर मानापुरे | Published: August 28, 2023 09:01 PM2023-08-28T21:01:54+5:302023-08-28T21:02:38+5:30

दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयाच्या ५ डॉक्टरांकडून ४५ मिनिटे विमानात उपचार : सीपीआर देऊन जीवदान, रुग्णालयात भरती, प्रकृती गंभीर

A 14-month-old girl has a heart attack! Emergency landing of aircraft at Nagpur | १४ महिन्यांच्या मुलीला हृदयविकाराचे झटके! विमानाचे नागपूरला इमरजन्सी लॅँडिंग

१४ महिन्यांच्या मुलीला हृदयविकाराचे झटके! विमानाचे नागपूरला इमरजन्सी लॅँडिंग

googlenewsNext

नागपूर : बेंगळुरू येथून दिल्लीला विमानाने प्रवास करीत असताना एका १४ महिन्यांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला. या गंभीर परिस्थितीत विमानाचे नागपूर विमानतळावर रविवारी रात्री आकस्मिक लॅण्डींग करण्यात आले. मुलीची प्रकृती गंभीर आहे. मुलीवर किम्स-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दिल्ली एम्सच्या पाच डॉक्टरांनी विमानात केले उपचार
विस्तारा एअरलाइन्सचे यूके८१४ विमान बेंगळुरूहून दिल्लीला जात होते. विमानातील १४ महिन्याच्या मुलीला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ती बेशुद्ध पडली. अशा परिस्थितीत याच विमानातून प्रवास करणाऱ्या दिल्ली एम्स हॉस्पिटलचे वरिष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. नवदीप कौर, वरिष्ठ कार्डिक रेडिओलॉजिस्ट डॉ. दमणदीप सिंग, डॉ. रिषभ जैन, डॉ. ओशिखा आणि वरिष्ठ कार्डिक रेडिओलॉजिस्ट अविचला तक्षक या पाच डॉक्टरांनी गंभीर वैद्यकीय परिस्थितीत मुलीला सीपीआर प्रदान करून जीव वाचविण्याच्या उपाययोजना तातडीने सुरू केल्या. तिचे पल्स गायब होते. हातपाय थंड पडले होते. ओठ पांढरे झाले होते. या डॉक्टरांनी तिच्यावर मर्यादित संसाधनाने तब्बल ४५ मिनिटे उपचार केले. त्यादरम्यान तिला पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर तिचा श्वास पुन्हा सुरू झाला.

रुग्णाला खासगी रुग्णालयात केले भरती
रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे विमान कंपनीच्या टीमने आपत्कालीन लँण्डींगसाठी नागपूर विमानतळ प्राधिकरणांशी संपर्क साधला. विमान नागपूर विमानतळावर उतरताच डॉक्टरांनी तिची तपासणी करून पुढील उपचारासाठी ॲम्ब्युलन्सने किम्स-किंग्सवे हॉस्पिटल्समध्ये भरती केले. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. बालरोग आणि निओनॅटोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. कुलदीप सुखदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णावर उपचार सुरू आहेत. रूग्ण व्हेंटिलेटरवर असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती हॉस्पिटलचे उपमहाव्यवस्थापक (ब्रॅण्डिंग व कम्युनिकेशन) एजाज शामी यांनी दिली.

विमान रात्री १२.२० वाजता रवाना
मेडिकल इर्मजन्सीच्या कारणांनी रविवारी रात्री १०.३० वाजता नागपूर विमानतळावर उतरलेले विस्तारा एअरलाईन्सचे विमान रात्री १२.२० वाजता दिल्लीकडे रवाना झाले. १४ महिन्यांची ही मुलगी बांग्लादेशची असून उपचारासाठी तिला बेंगळुरू येथे आणण्यात आले होते. उपचारानंतर तिला दिल्लीला आणि तेथून बांग्लादेशला नेण्यात येणार होते.

Web Title: A 14-month-old girl has a heart attack! Emergency landing of aircraft at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर