काळजावर दगड ठेवून आई-वडिलांनी निभावले कर्तव्य; १९ वर्षीय मुलाचे केले अवयवदान
By सुमेध वाघमार | Published: September 5, 2023 07:04 PM2023-09-05T19:04:06+5:302023-09-05T19:04:18+5:30
तिघांना मिळाले नवे जीवन
नागपूर : अपघातात गंभीर जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या आपल्या १९ वर्षीय मुलाचा जाण्याचे दु:ख सहन करण्यापलिकडे होते. मात्र त्या दु:खातही त्यांनी समाजाप्रति आपले कर्तव्य निभावले. काळजावर दगड ठेवून मुलाचे अवयवदान केले. या मानवतावादी निर्णयाने मृत्यूच्या दाढेत जगणाऱ्या तीन रुग्णांना नवे जीवन मिळाले.
प्रोसेस सर्व्हर सोसायटी, स्वावलंबी नगर, राणाप्रताप नगर येथील आर्यन आशिष जोशी (१९) त्या अवयवदात्याचे नाव. आर्यन हा आर्किटेक्चर ला प्रथम वषार्ला शिक्षण घेत होता. वडील एका दैनिकात वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. आई शिक्षिका आहेत. आर्यन हा मित्रांसोबत दुचाकीने बाहेर गेला होता. वर्धा रोडवरून जात असताना अचानक कारने मागून जोरदार धडक दिली. आर्यन गंभीर जखमी झाला. मित्रांनी त्याला मिहान येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. सलग तीन दिवस शर्थीच्या उपचारानंतरही तो प्रतिसाद देत नव्हता.
‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात इंटेन्सिव्हिस्ट डॉ. सुचेता मेश्राम, डॉ. ओम शुभम असई, डॉ. उदित नारंग, डॉ. वरिध कटियार या पथकाने आर्यनची तपासणी करून मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली. त्यांच्यावर दु:खाचे आभाळच कोसळले. एम्सचे ट्रान्सप्लांट समन्वयक प्रितम त्रिवेदी व प्राची खैरे यांनी आर्यनला अवयवरुपी जीवंत ठेवण्यासाठी अवयवदान करण्याचे कुटुंबियांचे समुपदेशन केले. त्या दु:खातही वडील आशिष व आई स्वाती जोशी यांनी अयवदानाला संमती दिली. याची माहिती माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र, (झेडटीसीसी) नागपुरला देण्यात आली. झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांच्या मार्गदर्शनात प्रत्यारोपण समन्वयक दिनेश मंडपे यांनी प्रतीक्षा यादी तपासून अवयवांचे वाटप केले.
-यकृत व दोन्ही किडनीचे दान
‘आर्यन’चे दोन्ही किडनी व यकृताचे दान करण्यात आले. यकृत न्यू इरा हॉस्पिटलमधील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाला, एक किडनी ‘एम्स’च्या ४४ वर्षीय पुरुष रुग्णाला तर दुसरी किडनी एसएस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ४३ वर्षीय महिलेला दान करण्यात आली.
- ‘एम्स’मध्ये चौथे किडनी ट्रान्सप्लांट
‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीगिरीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, आरोग्य विभागाकडून याच वर्षी किडनी ट्रान्सप्लांटला मंजुरी मिळाली. त्यानंतर ‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून मिळालेली पहिली किडनी प्रत्यारोपण मे महिन्यात झाले. त्यानंतर दुसरे आणि तिसरे आॅगस्ट महिन्यात आणि हे चौथे किडनी ट्रान्सप्लांट आहे. किडनीच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांसाठी ‘एम्स’ हे वरदान ठरत आहे.