रेती वाहतुकीच्या ट्रॅक्टरने घेतला चिमुकलीचा जीव; चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 02:45 PM2022-11-04T14:45:15+5:302022-11-04T14:47:14+5:30
धर्मापुरी शिवारात ऑटाेला धडक
माैदा / खात (नागपूर) : वेगात रेती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने टी पाॅईंटच्या वळणावर प्रवासी ऑटाेला जाेरात धडक दिली. त्यात पाच वर्षीय चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ऑटाेतील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मापुरी येथे गुरुवारी (दि. ३) सकाळी ११ च्या सुमारास घडली.
अप्सा परवेज शेख (५, रा. लाला लजपतराय वाॅर्ड, भंडारा) असे मृत चिमुकलीचे नाव असून, जखमींमध्ये गुलबाज खलील शेख (१७), खलील गुलाबमिया शेख (५०), नजिर हुसेन पठाण (३८) तिघेही रा. लाला लजपतराय वाॅर्ड, भंडारा व शाहरूख शेख सलीम शेख (२७, रा. पारडी, नागपूर) या चाैघांचा समावेश आहे. हे पाचही जण प्रवासी तीनचाकी ऑटाेने (एमएच-३६/एफ-८१५८) भंडाऱ्याहून काेदामेंढी (ता. माैदा) च्या दिशेने जात हाेते.
ते धर्मापुरी (ता. माैदा) येथील टी पाॅईंटच्या वळणावर पाेहाेचताच ट्रॅक्टरने (एमएच-४० / एल - ७२१३ (ट्राॅली क्रमांक- एमएच-३१ / झेड-९१०१) ऑटाेला जाेरात धडक दिली. धडक देताच ट्रॅक्टर ट्राॅलीसह राेडवर उलटला. यात अप्साचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ऑटाेतील चाैघे गंभीर जखमी झाले.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी भंडारा येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले तर अप्साचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर थाेटे, रा. इजनी, ता. माैदा याच्या विराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
रेतीची जीवघेणी वाहतूक
वाकेश्वर शिवारातील सूर नदीच्या पात्रात माेठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात असून, त्या रेतीची धर्मापुरी शिवारातून सतत वाहतूक केली जाते. महसूल विभागाची कारवाई टाळण्यासाठी चालक रेतीची वाहने वेगात नेतात व त्यातून अपघात हाेतात. काही दिवसांपूर्वी याच परिसरात ट्रकने कारला धडक दिली हाेती.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
अपघाताला कारणीभूत ठरलेला रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मालकीचा आहे. अपघात हाेताच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अलीकडे माैदा तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीला उधाण आले आहे. या व्यवसायात राजकीय पक्षाचे पदाधिकारी व त्यांचे हस्तक अधिक असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
रेतीचा अवैध उपसा व वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल विभाग कारवाई करीत आहे. महसूल विभागाने सप्टेंबरमध्ये केलेल्या कारवाईमध्ये अवैध रेती वाहतुकीचे दाेन ट्रक व तीन ट्रॅक्टर तसेच ऑक्टाेबरमध्ये सहा ट्रॅक्टर पकडले. महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी या भागाची पाहणी केली हाेती. परंतु, वाहन आढळून आले नाही.
- मलिक वीराणी, तहसीलदार, माैदा
वाकेश्वर, धर्मापुरी परिसरातून राेज माेठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक केली जाते. याबाबत प्रशासनाला माहिती असूनही प्रभावी कारवाई केली जात नाही. अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने रेती चाेरीला आळा घालावा.
- याेगेश देशमुख, जि. प. सदस्य, माैदा