धरमपेठ येथील ६० वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित; जीनोम सिक्वेन्सिंग करणार
By सुमेध वाघमार | Published: December 26, 2023 07:16 PM2023-12-26T19:16:20+5:302023-12-26T19:16:54+5:30
आतापर्यंत ९ रुग्णांची नोंद झाली असून ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी ‘नीरी’च्या प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहे.
नागपूर : कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व शासकीय यंत्रणेला ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. खबरदारीचे आवाहन केले जात असताना मंगळवारी धरमपेठ येथील एका ६० वर्षीय रुग्णाला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. आतापर्यंत ९ रुग्णांची नोंद झाली असून ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी ‘नीरी’च्या प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार (व्हेरियंट) ‘जेएन.१’ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर राज्यात रविवारी जेएन.१च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली. त्यात ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका असे एकूण १० रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात याचे किंचीत प्रमाण वाढत आहे. नागपुरच्या मनपा धरमपेठ झोनमधील रहिवासी ६० वर्षीय पुरुषाला सर्दी, खोकला, ताप व इतरही लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. शहरात आतापर्यंत कोरोनाचे १० रुग्ण झाले असून ९ रुग्णांचे नमुने नव्या व्हेरियंटचे निदान करण्यासाठी ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ला पाठविण्यात आले. लवकरच ६० वर्षीय रुग्णाचेही नमुने पाठविण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
-वृद्धांसाठी आठवड्यातून एकदा ‘बुस्टर डोस’
मनपाच्या आरोग्य विभागाने ६० वर्षांवरील वृद्ध, ‘हेल्थ केअर वर्कर’ व ‘फ्रंट लाईन वर्कर’ यांचे दोन डोस झाल्यानंतर दिला जाणारा ‘बुस्टर डोस’ची व्यवस्था महाल येथील प्रभाकर दटके रोग निदान केंद्रात करण्यात आली आहे. मात्र आठवड्यातून एकच दिवस, शनिवारी ही सोय उपलब्ध असणार आहे.
- घाबरू नका, काळजी घ्या -
‘जेएन.१’ या नव्या व्हेरियंटची चर्चा आता होऊ लागली आहे. यामुळे घाबरून जावू नका, काळजी घ्या. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जायचेच असल्यास जाताना सुरक्षेची खबरदारी मास्क घाला. या शिवाय, नियमित हात धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे यासारख्या सवयी पुन्हा एकदा अंगीकारा. लक्षणे दिसताच उपचार घ्या.
-डॉ. जय देशमुख, वरीष्ठ फिजीशियन