नागपूर महापालिकेच्या भरारीची साक्ष देणारे ‘बलून’ आकाशात सोडले!
By गणेश हुड | Published: March 2, 2023 07:48 PM2023-03-02T19:48:12+5:302023-03-02T19:49:04+5:30
Nagpur News नागपूर महापालिकेच्या ७२ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी मनपा मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ७२ वर्षांतील महापालिकेच्या भरभराटीची साक्ष देणारे ‘बलून’ आकाशात सोडले.
नागपूर : नागपूर महापालिकेच्या ७२ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी मनपा मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ७२ वर्षांतील महापालिकेच्या भरभराटीची साक्ष देणारे ‘बलून’ आकाशात सोडले.
मनपा शाळेतील शिक्षक दाम्पत्य प्रगती व सुनील सरोदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर जी-२० शिखर परिषदेच्या आयोजनाचा संदेश देणारी आकर्षक रांगोळी साकारली होती. संगीत चमूने स्वागत गीत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘जय जय शिवराया’ हे गीत सादर केले. मनपा शाळांमधील मुलांनी पथनाट्य सादर करून उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कौतुकाची दाद मिळविली. मुलांनी जी-२० शिखर परिषदेच्या अनुषंगाने शहरात होणाऱ्या नागरी सुविधांच्या बैठकीची माहिती मनोरंजकपणे सादर केली. तसेच स्वच्छता, ओला, सुका कचरा विलगीकरण, झिरो वेस्ट याबाबतही पथनाट्याद्वारे जनजागृती केली.
प्रारंभी राधाकृष्णन बी. यांनी मुख्यालयातील हिरवळीवरील मनपाचे प्रथम महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, सहायक आयुक्त महेश धामेचा, उपायुक्त मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी प्रास्ताविकातून मनपाच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला.
नागरी सुविधा पुरविण्याबाबत तत्पर व्हा : आयुक्त
समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीपर्यंत दररोज पोहोचणारी यंत्रणा नागपूर महापालिका आहे. महापालिकेद्वारे जनतेला विविध ४२ प्रकारच्या नागरी सुविधा पुरविल्या जातात. शहराची लोकसंख्या वाढत असताना या सर्व सुविधा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या विभागाचे मूळ उद्दिष्ट लक्षात घेऊन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुविधा पोहोचविण्यास तत्पर राहावे, असे आवाहन राधाकृष्णन बी. यांनी कर्मचाऱ्यांना केले.