महिनाभरात एसटीच्या वाहकाला गुलाबी नोटेचे दर्शनच नाही; प्रवाशांकडे दोन हजार रुपयांची नोटच दिसेना

By नरेश डोंगरे | Published: October 3, 2023 07:59 PM2023-10-03T19:59:56+5:302023-10-03T20:00:23+5:30

नागपूर जिल्ह्यात एसटीचे एकूण आठ आगार आहेत. त्यातील चार नागपूर शहरात तर चार आगार जिल्ह्यातील रामटेक, सावनेर, उमरेड आणि काटोल शहरात आहेत.

A bearer of ST does not see a pink note 2000 rs in a month; Not a single note of two thousand rupees was found with the passengers | महिनाभरात एसटीच्या वाहकाला गुलाबी नोटेचे दर्शनच नाही; प्रवाशांकडे दोन हजार रुपयांची नोटच दिसेना

महिनाभरात एसटीच्या वाहकाला गुलाबी नोटेचे दर्शनच नाही; प्रवाशांकडे दोन हजार रुपयांची नोटच दिसेना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिनाभरात एसटी बसेसचे नागपूर विभागातील एकूण उत्पन्न ११ कोटी, ४२ लॉक, १७ हजार, ६३७ रुपये झाले. मात्र, एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एकाही प्रवाशाने एसटीच्या वाहकाकडे तिकिट घेण्यासाठी दोन हजार रुपयाची नोट दिली नाही. काहीसे कुतुहलजनक असले तरी हे सत्य आहे. महिनाभरात एसटीच्या कोणत्याही वाहकाला दोन हजारांच्या गुलाबी नोटेचे दर्शनच झाले नाही.

नागपूर जिल्ह्यात एसटीचे एकूण आठ आगार आहेत. त्यातील चार नागपूर शहरात तर चार आगार जिल्ह्यातील रामटेक, सावनेर, उमरेड आणि काटोल शहरात आहेत. या आठ आगारातून एकूण ४३२ बसेस राज्यातील वेगवेगळ्या आगारात धावतात. अर्थात या सर्व बसेसवर वाहक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी प्रवाशांकडून दोन हजारांची नोट २९ सप्टेंबरपर्यंतच स्विकारावी, असे आदेश एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, काय गंमत! गेल्या महिनाभरात दोन हजारांची एकही नोट घेऊन कुणी प्रवासी कोणत्या बसमध्ये तिकिट काढण्यासाठी वाहकाकडे आला नाही. त्यामुळे ४३२ बसेसमधील कोणत्याच वाहकाला सप्टेंबर महिन्यात दोन हजारांच्या गुलाबी नोटेचे दर्शनच झाले नाही.

महिनाभरात कोणत्या आगाराचे किती उत्पन्न?
अगार उत्पन्न
घाटरोड आगार - १,४७,६९,५५९
गणेशपेठ आगार - २,१२,०२,३४३
इमामवाडा आगार - १,७२,६१,७५५
वर्धमान नगर आगार - १,२६,८१,७९८
उमरेड आगार - ९८,८१,३६५
काटोल आगार - १,३१,४६,६४९
रामटेक आगार - १,१८,८२,५१४
सावनेर आगार - १,३३,९१,६५४

 एसटीत मोठी नोट पाचशेची
एसटी महामंडळात विविध घटकातील प्रवाशांना प्रवास भाड्यात वेगवेगळी सवलत मिळते. त्यामुळे प्रवास मुल्य फारसे जास्त नसते. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी शंभरातून दोन चार जणच पाचशेंची नोट देतात. अन्य प्रवासी ५०, १००अथवा २०० रुपयांची नोट देऊन तिकिट काढतात. अर्थात एसटीच्या दैनंदिन व्यवहारात सर्वात मोठी नोट पाचशेंचीच असते, असेही वाहक सांगतात.

'दोन हजाराची नोट असती तर कारनेच गेलो नसतो का साहेब',
या संबंधाने वाहकांसोबत सहज चर्चा केली असता त्यांनीही बोलकी प्रतिक्रिया वजा माहिती दिली. आम्ही प्रवाशांना सहजपणे दोन हजारांची नोट असेल तर चालेल. तुम्हाला तिकिट मिळेल, असे म्हटले असता त्यांनी आमचीच फिरकी घेतल्याचे सांगितले. आमच्या जवळ 'दोन हजाराची नोट असती तर कारनेच गेलो नसतो का साहेब', असाही प्रतिप्रश्न केल्याचे वाहकांनी सांगितले.

''एसटीने प्रवास करणारा गट सर्वसाधारण मध्यमवर्गिय असतो. त्यामुळे शक्यतो ही मंडळी प्रवासाला निघताना फार मोठी रक्कम किंवा चलनातील मोठी नोट जवळ बाळगताना दिसत नाही. ते तिकिट काढण्यासाठी शंभर, दोनशे आणि खूप झाले तर एखाद, दुसरा प्रवासी पाचशेच्या नोटाचा वापर करीत असल्याचा अनुभव आहे.''
- श्रीकांत गभणे
उपमहाव्यवस्थापक, एसटी, नागपूर

Web Title: A bearer of ST does not see a pink note 2000 rs in a month; Not a single note of two thousand rupees was found with the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.