३७ लाखांची सुपारी घेतली अन ‘बाऊन्स’ होणारा चेक दिला; सुपारी व्यापाऱ्याला गंडा
By योगेश पांडे | Published: August 8, 2023 05:37 PM2023-08-08T17:37:22+5:302023-08-08T17:41:19+5:30
पैसे मागितले असता जीवे मारण्याची धमकी
नागपूर : नागपुरातील एका सुपारी व्यापाऱ्याला दुसऱ्या व्यापाऱ्याने तब्बल ३७ लाख रुपयांनी गंडा घातला. सुपारी विकत घेतल्यावर त्याने ‘बाऊन्स’ होणारे धनादेश दिले. शिवाय व्यापाऱ्याने पैसे परत मागितले असता जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मोहम्मद बशीर मोहम्मद अब्दुल रहमान (४३, क्वेटा कॉलनी) यांचे मस्कासाथ येथील केरल गल्लीत सुपारीचे दुकान आहे. ४ ऑगस्ट २०२२ रोजी नानक श्याम सुवरानी (३६, साईकृपा अपार्टमेंट, छापरूनगर) हा त्यांचा दुकानात आला व सुपारी खरेदी करण्याबाबत बोलणे केले. त्याने त्याचे वडील असोसिएशनचे सदस्य असल्याचे सांगितले व त्यानंतर ३७.२६ लाखांचा माल खरेदी केला. त्यावेळी त्याने सुपारी व्यापाऱ्याला ३५ लाखांचा तसेच ३४,५३० रुपयांचा असे दोन धनादेश दिले. तसेच उरलेली रक्कम महिन्याभरात आरटीजीएस करतो असे सांगितले.
फिर्यादीने बॅंकेत धनादेश टाकले असता ते बाऊन्स झाले. तर सुवरानीने उर्वरित रक्कम आरटीजीएसदेखील केली नाही. मोहम्मद बशीर मोहम्मद अब्दुल रहमान यांनी सुवरानीला वारंवार संपर्क केला, मात्र त्याने टाळाटाळ केली. अखेर त्याने फोन उचलला व माझ्याकडे पैसे नाहीत, जे करायचे आहे ते कर असे म्हणत शिवीगाळ केली आणि अपहरण करत जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी नानक सुवरानीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.