चक्क पोलीस ठाण्याच्या ड्युटीरुममध्ये घेतली लाच, हवालदारासह दोघांना रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 10:34 PM2023-03-27T22:34:33+5:302023-03-27T22:35:11+5:30
Nagpur News दोन वर्षांअगोदरची तक्रार निकाली काढण्यासाठी ४० हजारांची लाच घेताना अजनी पोलीस ठाण्यातील एका हवालदारासह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस ठाण्यातील ड्युटी रूममध्ये ही लाच घेण्यात आली.
नागपूर : दोन वर्षांअगोदरची तक्रार निकाली काढण्यासाठी ४० हजारांची लाच घेताना अजनी पोलीस ठाण्यातील एका हवालदारासह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस ठाण्यातील ड्युटी रूममध्ये ही लाच घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी केलेल्या या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
हवालदार निलेश इंगळे (४४) व प्रकाश चिकाटे (४५, जुना बाबुलखेडा) अशी आरोपींची नावे आहेत. पन्नासे ले आऊट येथील ५२ वर्षीय व्यक्तीच्या मुलाविरोधात दोन वर्षांअगोदर अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. हा तक्रारअर्ज निकाली काढण्यासाठी संबंधित व्यक्तीचे प्रयत्न सुरू होते. चिकाटे व इंगळेने त्याला गाठून ४० हजार रुपयांत अर्ज निकाली काढू असे सांगितले. संबंधित व्यक्तीला लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीची चौकशी करून पथकाने सापळा रचला. ठरल्यानुसार संबंधित व्यक्तीने सोमवारी ड्युटी रूममध्ये इंगळेला ४० हजार रुपये दिले. यावेळी दबा धरून बसलेल्या पथकाने इंगळे व चिकाटेला रंगेहाथ पकडले. दोघांविरोधातही भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभय आष्टेकर, युनूस शेख, शिरसाट, महेश सेलोकर, भागवत वानखेडे , सदानंद यांच्या पथकाने ही कारवाई केली.
-लाच नेमकी कुणासाठी ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही लाच इंगळे याने स्वत:साठी घेतली की कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून घेतली याची पथकाकडून चौकशी सुरू आहे. याशिवाय खाजगी व्यक्ती असलेल्या चिकाटेच्या भूमिकेची सखोल चौकशी केली जात आहे.