संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याच्या फोनमुळे खळबळ; सुरक्षा वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2022 21:47 IST2022-12-31T21:45:23+5:302022-12-31T21:47:22+5:30

Nagpur News महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा फोन शनिवारी दुपारच्या सुमारास नियंत्रण कक्षात आल्यामुळे एकच खळबळ उडाली.

A call to bomb Sangh HQ stirs; Enhanced security | संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याच्या फोनमुळे खळबळ; सुरक्षा वाढविली

संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याच्या फोनमुळे खळबळ; सुरक्षा वाढविली

ठळक मुद्देवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली भेट बॉम्बशोधक पथकातर्फे परिसराची पाहणी

नागपूर : महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा फोन शनिवारी दुपारच्या सुमारास नियंत्रण कक्षात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संघ मुख्यालयाला भेट देऊन सुरक्षेत वाढ केली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संघ मुख्यालयाचा परिसर पिंजून काढला. धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षाला एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी दिली. धमकी देऊन संबंधित आरोपीने फोन बंद केला. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली. नियंत्रण कक्षाने त्वरित पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संघ मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या साह्याने संघ मुख्यालय परिसर पिंजून काढण्यात आला. परंतु, कुठेच काही आक्षेपार्ह बाब आढळली नाही. धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर क्राईमच्या माध्यमातून निनावी फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. मागील महिन्यात सचिन कुळकर्णी नावाच्या महापारेषणच्या अभियंत्याने संघ मुख्यालय उडविण्याची धमकी दिली होती. त्याला सक्करदरा पोलिसांनी अटक केली होती. नववर्षाच्या अखेरच्या दिवशी खळबळ उडविण्यासाठी खोडसाळपणे कोणीतरी धमकीचा फोन केला असल्याचा पोलिसांना संशय आहे.

संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ

‘दुपारच्या सुमारास संघ मुख्यालय बॉम्बने उडविण्याचा फोन नियंत्रण कक्षाला आला होता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संघ मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, बॉम्बशोधक व नाशक पथकाने परिसराची पाहणी केली आहे. पोलिस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.’

-अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, नागपूर शहर

...........

Web Title: A call to bomb Sangh HQ stirs; Enhanced security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.