धीरेंद्र कृष्ण महाराजांना नागपूर पोलिसांची ‘क्लीन चिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 04:20 PM2023-01-25T16:20:12+5:302023-01-25T16:29:14+5:30
Nagpur News दिव्य दरबारवरून चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांना नागपूर पोलिसांनी ‘क्लीन चिट’ दिली आहे.
नागपूर : दिव्य दरबारवरून चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांना नागपूर पोलिसांनी ‘क्लीन चिट’ दिली आहे. नागपुरात झालेल्या त्यांच्या कार्यक्रमादरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ चे कुठेही उल्लंघन झालेले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर पोलिसांनी संपूर्ण व्हिडीओजची तपासणी केली होती. दरम्यान, जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांचे दावे खोडले गेल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
धीरेंद्र महाराज यांचे नागपुरात ५ ते ११ जानेवारीदरम्यान नागपुरात वास्तव्य होते. ७ व ८ जानेवारी रोजी त्यांचा दिव्य दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बागेश्वर महाराज यांनी अंधश्रद्धा पसरविली व चमत्काराच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली. हे कायद्याचे उल्लंघन आहे व त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मानव यांनी पोलिसांकडे केली होती. तसे पत्रही त्यांनी दोनदा लिहिले होते. यानंतर, पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी दिव्य दरबारच्या पूर्ण व्हिडीओची सखोल तपासणी केली. त्यातून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ चे कुठेही उल्लंघन आढळलेले नाही. मानव यांनी त्यांच्या अर्जात विशिष्ट वेळेचे उल्लेख केला होता. आम्ही केवळ नागपुरात झालेल्या कार्यक्रमाच्या फुटेजची तपासणी केली. यात कुठल्याही प्रकारे कायदा मोडल्याचा गुन्हा होत असल्याचे निदर्शनास आलेले नाही. चमत्कार किंवा अंधश्रद्धेची कुठलीही बाब आढळलेली नाही, तसेच श्याम मानव यांना कळविण्यात आले आहे, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
सहा तासांच्या फुटेजची तपासणी
तक्रार प्राप्त झाल्यावर संबंधित फुटेजची तपासणी करण्यात आली. दिव्य दरबारचे फुटेज सहा तासांहून अधिक वेळेचे होते. फुटेज पूर्ण पाहून त्याची ट्रान्स्क्रिप्ट तयार करण्यात आली. त्यानंतर, कायद्याच्या दृष्टीने कुठे गुन्हा दाखल होऊ शकतो का, याचीच चाचपणी करण्यात आली, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. या प्रकरणात पोलिस कुठल्याही दबावात नाही व नियमानुसारच प्रक्रिया झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मानव न्यायालयात जाणार का?
मानव यांनी बागेश्वर महाराजांना नागपुरात येऊन दिव्यशक्ती सिद्ध करून देण्याचे आव्हान दिले होते. यावरून राजकारणही तापले. आता नागपूर पोलिसांनी हे निष्कर्ष मांडल्यामुळे मानव यांची अडचण झाली आहे. या संदर्भात त्यांची इच्छा असेल, तर ते न्यायालयात जाऊ शकतात. मात्र, पोलिसांनी नियमानुसारच तपासणी केली आहे, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मानव आता न्यायालयात दाद मागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.