अखेर ‘थर्टी फर्स्ट’ पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 03:22 PM2023-01-03T15:22:51+5:302023-01-03T15:27:26+5:30
पार्टीत समाजकंटकांनी उच्चभ्रू कुटुंबातील महिलेचा विनयभंग करून तिच्यावर दारूच्या बाटलीने हल्ला केल्याने वातावरण तापले
नागपूर : महिलांचा विनयभंग आणि अमली पदार्थांचा वापर केल्याप्रकरणी वाडी पोलिसांनी थर्टी फर्स्ट पार्टीच्या तोडफोडीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. 'लोकमत'ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली.
मुकेशकुमार विजेंद्र सिंग, निखिल सुहास नाईक, शिव संतोष वडेट्टीवार आणि अमीन ऊर्फ नफीस खान अशी आरोपींची नावे आहेत. मुकेश सिंग हा डब्लिन ८८ हॉटेलचा संचालक असून, निखिल त्याचा भागीदार आहे, तर शिव वडेट्टीवार आणि अमीन खान इव्हेंट कंपनी चालवतात. ३१ डिसेंबरच्या रात्री सुराबर्डी येथील डब्लिन ८८ हॉटेलमध्ये या पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. त्यांनी लोकांकडून पैसे घेतले व व्हीआयपी टेबल, दारू आणि इतर लक्झरी सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले.
पार्टी निर्जन भागात असल्याने मोठ्या संख्येने तरुण पोहोचले होते. यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्याही मोठी होती. या पार्टीत समाजकंटकांनी उच्चभ्रू कुटुंबातील महिलेचा विनयभंग करून तिच्यावर दारूच्या बाटलीने हल्ला केल्याने वातावरण तापले. यानंतर समाजकंटकांनी अल्पवयीन मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली.
‘न्यू इयर’च्या 'फुल्ल टू झिंगाट' पार्टीत राडा, महिला-मुलींची छेडखानी; संतप्त नागरिकांकडून तोडफोड
महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने परिस्थिती अनियंत्रित झाली. विनयभंग, गुंडागर्दी तसेच दारू आणि जेवणाची व्यवस्था न केल्यामुळे लोकांनी आयोजकांचा शोध सुरू केला. आरोपी आयोजकांनी अन्न आणि दारू संपल्याचे सांगितले. लोकांनी पैसे परत मागितल्यावर आरोपींनी त्यांना धमकावणे आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. लोकांचा वाढता रोष पाहून आरोपी पळून गेले, त्यानंतर संतप्त लोकांनी पार्टीची तोडफोड केली. पोलिस आल्यानंतरही लोक शांत होत नव्हते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीचा भाऊ आणि इतर काही लोकांचीही पार्टी आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका होती. जाणूनबुजून या लोकांना आरोपी करण्यात आलेले नाही. पार्टीत एमडी आणणाऱ्या बुकींचे सत्य समोर आल्यास शहरात खळबळ उडू शकते.
मोठी घटना घडूनही गुन्हा दाखल नाही
एवढी मोठी घटना घडूनही वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या घटनेची माहिती मिळू शकली नाही. रविवारी सत्यता लक्षात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला. यानंतर वाडी पोलिसांनी आरोपींच्या घरांवर छापा टाकला. याबाबत सुगावा लागताच आरोपी फरार झाला. पार्टीत बिनदिक्कतपणे अमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. अल्पवयीन मुलींचीही छेड काढण्यात आली. हीच घटना दुसऱ्या प्रसंगी घडली असती तर अल्पवयीन मुलीच्या शोषणाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असता. पार्टीत सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलांची चौकशी केल्यास प्रकरण आणखी तापू शकते, हे पोलिसांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी आरोपींविरुद्ध दंगल आणि तोडफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आयोजकांनी क्षमतेपेक्षा जास्त पासेसची विक्री केली होती