माजी नगरसेवकाच्या मुलाच्या आत्महत्या प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: October 3, 2023 04:42 PM2023-10-03T16:42:11+5:302023-10-03T16:42:25+5:30
संतप्त कुटुंबीयांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन
नागपूर : माजी नगरसेवकाच्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणात त्याच्या पत्नीच्या वडिलांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आत्महत्येवरून संतप्त कुटुंबीयांनी पाचपावली पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले होते.
बसपाचे माजी नगरसेवक नरेंद्र वालदे यांचा मुलगा शांतनू (२७, जरीपटका) याने १९ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये शांतनूचा ऋतिका नावाच्या तरुणीशी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही कालावधीतच पतीशी वाद झाल्याने ती माहेरी परतली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. १८ सप्टेंबरला शंतनू पत्नीला भेटायला सासरी जरीपटक्यात गेला. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार त्याचे सासरे रवी गजभिये व कार्तिक गजभिये (लष्करीबाग) यांनी दाखल केली होती व त्या प्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात शांतनूविरुद्ध गुन्ह्याची नोंद करत अटक केली होती.
१९ सप्टेंबरला त्याला जामीन मिळाला. मात्र या प्रकारामुळे तो कमालीचा दुखावला होता व त्याने त्याच रात्री राहत्या घरी गळफास लावत आत्महत्या केली. शवविच्छेदनानंतर शांतनूचे कुटुंबीय आणि बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मृतदेह घेऊन पाचपावली पोलिस ठाण्यात पोहोचले व त्यांनी पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी करत शांतनूला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात त्याच्या वडिलांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर रवी गजभिये व कार्तिक गजभियेसह चार जणांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.