सावरकरांचा पुतळा जाळणे भोवले, कुणाल राऊतविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: February 8, 2024 10:03 PM2024-02-08T22:03:57+5:302024-02-08T22:04:20+5:30
१ फेब्रुवारी रोजी कुणाल राऊत व युवक कॉंग्रेस तसेच एनएसयूआयचे कार्यकर्ते विद्यापीठात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळण्याप्रकरणी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाझरी पोलीस ठाण्यात राऊतसह १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१ फेब्रुवारी रोजी कुणाल राऊत व युवक कॉंग्रेस तसेच एनएसयूआयचे कार्यकर्ते विद्यापीठात आले होते. पश्चिम क्षेत्रीय युवा महोत्सवात विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्यावरील चित्रफित का दाखविली असा सवाल त्यांनी कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांना केला. त्यानंतर कुलगुरूंच्या दालनातच सावरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. कुलगुरूंनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने सन्मानित केलेल्या महापुरुषांवर माहितीपट तयार करण्यात आल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. मात्र त्यावरदेखील कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सावरकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आग लावण्यात आली.
सुरक्षारक्षकांनी धाव घेत आग विझविली होती. या प्रकारानंतर विद्यापीठातील राजकारण तापले होते. भाजयुमोने याविरोधात आंदोलन करत विद्यापीठाने या प्रकाराविरोधात पोलीस तक्रार करावी अशी मागणी केली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.राजू हिवसे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परवानगी न घेता आंदोलन, विद्यापीठाचे नुकसान करणे इत्यादीबाबत त्यांची तक्रार होती. पोलिसांनी कुणाल राऊतसह अजित सिंह, आशीष मंडपे व इतर १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.