‘आरपीटीएस’मधील प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येप्रकरणात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: August 22, 2024 04:05 PM2024-08-22T16:05:40+5:302024-08-22T16:11:17+5:30
Nagpur : ‘ मी मेल्यानंतर प्लीज कुणीही माझा फोटो स्टेटसला ठेवू नका. माझ्या आईला माहिती पडू देऊ नका.’
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक पोलिस प्रशिक्षण केंद्रातील एका महिला प्रशिक्षणार्थीने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. जुलै महिन्यात झालेल्या या घटनेसाठी तिच्या प्रियकराला जबाबदार धरत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतीक्षा भोसले (२८, बारामती, पुणे) असे मृत महिला प्रशिक्षणार्थीचे नाव होते. तिची मुंबई पोलीस दलात निवड झाली होती. प्रतीक्षा प्रशिक्षण केंद्रात दाखल झाल्यापासूनच एकाकी राहत होती. कौटुंबिक समस्या असल्याचे कारण ती सांगायची. ८ जुलै रोजी रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर तिने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी ती परेडला हजर न झाल्यामुळे तिच्या खोलीत डोकावून बघितले असता प्रतीक्षा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. बजाजनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
चौकशीदरम्यान प्रतीक्षाचे निरंजन राजेंद्र नलावडे (२८, बत्तीस शिराळा, सांगली) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आली होती. त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यांचे नियमित संभाषण व चॅटिंग सुरू होते. मात्र एप्रिल महिन्यात त्याने प्रतीक्षाला कुठलीही माहिती न देता गुपचूप दुसऱ्याच तरुणीशी लग्न केले. ही बाब कळाल्यावर तिला मोठा धक्का बसला होता व ती मानसिकदृष्ट्या कोलमडली. त्याच नैराश्यातून तिने गळफास घेतला. तिने आत्महत्या करण्यापूर्वी मनगटावर प्रियकराच्या नावाने मंगळसूत्र बांधले होते. ‘ मी मेल्यानंतर प्लीज कुणीही माझा फोटो स्टेटसला ठेवू नका. माझ्या आईला माहिती पडू देऊ नका.’ अशी विनंतीवजा चिठ्ठी प्रतीक्षाने आत्महत्येपूर्वी लिहिली होती. तिच्या आई शकुंतला भोसले (४९, इंदापूर, सांगली) यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. प्राथमिक चौकशीनंतर प्रतीक्षाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबाबत निरंजनविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.