बाळविक्रीच्या रॅकेटमध्ये डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 09:46 PM2023-02-18T21:46:40+5:302023-02-18T21:47:19+5:30
Nagpur News संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बाळविक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी एका महिलेच्या गरिबीचा फायदा घेत आरोपींनी तिला फसविल्याची बाब समोर आली आहे.
नागपूर : संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बाळविक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी एका महिलेच्या गरिबीचा फायदा घेत आरोपींनी तिला फसविल्याची बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात एका डॉक्टरचादेखील सहभाग होता. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत आणखी एका महिलेला अटक केली आहे.
गरीब महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या नवजात बालकांची पैशांच्या मोबदल्यात विक्री करणाऱ्या रॅकेटचा नागपूर पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात भंडाफोड केला होता. गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू असताना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला या रॅकेटमध्ये ओढल्याची बाब समोर आली. आरोपी सचिन पाटील, आएशा खान, मकबूल खान यांच्यासह डॉ. नीलेश मौर्य (३७) व रेखा पुजारी (५४, निर्मल कॉलनी, जरीपटका) यांनी ३० वर्षीय महिलेशी संपर्क साधला. तिला पैशांचे आमिष दाखवून त्यांनी ती गर्भवती असतानाच गर्भ वाढविण्यासंदर्भातील औषधे पुरविली व डिलिव्हरीनंतर बाळ आम्ही घेऊ असे सांगितले.
२९ फेब्रुवारी २०२२ रोजी तिची नागपुरातील नर्सिंग होममध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली. तिच्या नवजात मुलीला आरोपींनी आपल्या ताब्यात घेतले व तिची विक्री केली. त्यांनी त्याबदल्यात महिलेला थोडे पैसे दिले. अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून हा प्रकार समोर आला. पोलिसांनी महिलेशी संपर्क साधला असता तिने सत्यता सांगितली. यानंतर कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली व शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रेखा पुजारीला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, गजानन चांभारे, मनीष पराये, ऋषिकेश डुंबरे, शरीफ शेख, पल्लवी वंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.