‘हनिट्रॅप’ची तक्रार करणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: November 9, 2022 11:46 PM2022-11-09T23:46:36+5:302022-11-09T23:48:09+5:30
अधिकारी उचकेच्या दाव्यावर संशयाचे ढग : घाणेरडी चॅटिंग करत अश्लील व्हिडीओ पाठविल्याची तक्रार
योगेश पांडे
नागपूर : महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी तक्रार केलेल्या ‘हनिट्रॅप’ प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’ आला आहे. उचके यांनी स्वत:च महिलेला अश्लील व्हिडीओ-छायाचित्र पाठवले तसेच तिच्यासोबत अश्लील ‘चॅटिंग’ही केले होते, असा आरोप लावण्यात आला आहे. यासंदर्भात छत्तीसगडच्या राजनांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. यामुळे प्रकरणाची नव्याने चौकशी होणार असून, उचके अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपुरातील उच्चशिक्षित तरुणीची छत्तीसगडमधील अमित सोनीशी फेसबुकवरून ओळख झाली व दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. २०२१ मध्ये दोघांनीही लग्न केले. उचके व तरुणीची अगोदरपासूनच ओळख होती. दोघांमध्ये संवाददेखील होत होता. मात्र १७ जून २०२२ पासून उचकेने अश्लील चॅटिंग करण्यास सुरुवात केली. सोबतच स्वत:चे अश्लील व्हिडीओ, पॉर्न व्हिडीओ व ऑडिओदेखील पाठविले. तक्रारीनुसार उचकेने तिला शारीरिक संबंध बनविण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यावरून तरुणीने त्याला जाब विचारला असता त्याने तिला अधिकारी असल्याचे सांगत कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे प्रचंड मन:स्ताप होत असून आत्महत्येचे विचार मनात येत असल्याचे संबंधित तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. राजनांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तेथे कलम ५०६ (ब), ५०९ (ब) व आयटी ॲक्ट ६७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंबित करण्याची मागणी
राजेंद्र उचके यांनी गुन्हे शाखेकडे १ कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार केली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन अमित सोनीला अटक केली होती. या प्रकरणात सोनीला सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. यासंदर्भात सोनीचे वकील ॲड. त्रिशील खोब्रागडे यांनी राज्यपाल व राज्य शासनाला पत्र पाठवून राजेंद्र उचके यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ज्या पद्धतीने पावले उचलली होती ती संशयास्पद होती. उचकेविरोधात मनपातदेखील अनेक तक्रारी असून त्वरित निलंबनाची कारवाई करायला हवी, असे पत्रात नमूद आहे.