पोलीस ठाण्यातील राडा महागात...भाजप नेता मुन्ना यादव व दोन्ही मुलांविरोधात अखेर गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: October 6, 2024 09:13 PM2024-10-06T21:13:55+5:302024-10-06T21:14:11+5:30
राजकीय दबावामुळे कठोर कारवाई नाही : प्रकरण दाबण्यासाठी धावणारा तो भाजप आमदार कोण ?
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याच्या प्रकरणात भाजपचा वादग्रस्त नेता मुन्ना यादव व दोन्ही मुलांविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राजकीय दबावामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करता आली नाही व त्यामुळे पोलीस खात्यातच संतापाचा सूर आहे. दरम्यान, हे प्रकरण दाबण्यासाठी धंतोली पोलीस ठाण्यात धाव घेणारा भाजपचा आमदार कोण आहे याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत.
मुन्ना यादव आणि त्याचा भाऊ बाला यादव यांच्यात दीर्घकाळापासून शत्रुत्व आहे. या शत्रुत्वामुळे त्यांच्यात अनेक वेळा मारामारीही झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ७ वाजता मुन्नाच्या भावाच्या मुलाला करण व अर्जुन यादवच्या साथीदारांनी मारहाण केली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. तेथील वाहनेदेखील फोडण्यात आली. जखमींना न्यूरॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन्ही गटातील लोकांनी धंतोली पोलीस ठाणे गाठले. रात्री ९ वाजता मुन्नाचा मुलगा अर्जुन आणि करण हे दुसऱ्या गटातील सदस्यांना पोलीस ठाण्यातच शिवीगाळ करत होते. तेथील हवालदार सुभाष वासाडे यांनी करण-अर्जुनला समजावण्यास सुरुवात केली. मात्र मुन्ना व त्याच्या मुलांनी वासाडे व इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. एका कर्मचाऱ्याची कॉलरदेखील पकडली. उपायुक्त राहुल मदने यांच्यासमोरदेखील यादव पिता-पुत्राने आक्रस्ताळेपणा दाखविला. या प्रकरणात मुन्ना व बाला यादव यांच्यापैकी कुणीही एकमेकांविरोधात तक्रार दिली नाही. मात्र शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी मुुन्ना, करण व अर्जुन यादव यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ३५१, ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस ठाण्यासमोरही धमक्या दिल्या
धंतोली पोलिसांचे पथक जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. हे पाहून मुन्ना यादव पोलिसांच्या जीपजवळ गेला व तेथे वासाडे यांना धमकी दिली.
तो आमदार कोण ?
दरम्यान, या घटनेनंतर मुन्ना यादवची बाजू घेत भाजपचा एक आमदार धंतोली पोलीस ठाण्यात पोहोचला. संबंधित आमदार विधानसभेत उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नरत असून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीदेखील केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे भाजपकडून महाजनसंपर्क मोहीम राबवत गृहसंपर्क सुरू असताना नवरात्रीदरम्यान राडा घालत दहशत निर्माण करणाऱ्या मुन्ना यादवची बाजू घेणाऱ्या आमदाराचे भाजप समर्थन करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.