वस्तीतीलच नागरिकाला मारहाण, माजी नगरसेवक संजय भुर्रेवारविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: May 3, 2024 11:47 PM2024-05-03T23:47:48+5:302024-05-03T23:48:18+5:30
हरीश नरसिंगराव दोरसटवार (५५, मोहननगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. तक्रारीनुसार १ मे रोजी हरीश दूध घेण्यासाठी एका दुकानात गेले असता तेथे समोरच संजय बुर्रेवार बसून होते. दुकानदाराशी बोलताना दोरसटवारने अगोदरचा नगरसेवक तांबे खूप चांगला होता असे म्हटले.
नागपूर : बसपाचे माजी नगरसेवक संजय बुर्रेवार यांचा वस्तीतीलच एका व्यक्तीसोबत झालेला वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. संबंधित व्यक्तीने बुर्रेवार यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार केली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर बुर्रेवार यांच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
हरीश नरसिंगराव दोरसटवार (५५, मोहननगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. तक्रारीनुसार १ मे रोजी हरीश दूध घेण्यासाठी एका दुकानात गेले असता तेथे समोरच संजय बुर्रेवार बसून होते. दुकानदाराशी बोलताना दोरसटवारने अगोदरचा नगरसेवक तांबे खूप चांगला होता असे म्हटले. यावरून बुर्रेवारने शिवीगाळ करत दोरसटवारच्या डोक्यावर स्टीलचा ड्रम मारला. दोरसटवारच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यानंतर बुर्रेवारने प्लास्टिकच्या क्रेटने दोरसटवारवर प्रहार केला.
या प्रकारामुळे वस्तीत खळबळ उडाली. नागरिक एकत्रित आल्यावर त्यांनी दोरसटवारला दवाखान्यात नेले. दोसरटवारच्या तक्रारीवरून पोलिसांनी बुर्रेवारविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर बुर्रेवारच्या तक्रारीनुसार दोरसटवारने गडरची झाकणे चोरी जातात या मुद्द्यावरून शिवीगाळ केली. बुर्रेवारने जाब विचारला असता दोरसटवारने मारहाण करत धक्का दिला. दोरसटवार परत येत असल्याने मी स्टीलच्या ड्रमने बचाव केला व त्यात तो जखमी झाला असा दावा बुर्रेवारने केला आहे. तसेच बचावासाठीच प्लास्टिकची क्रेट उचलली असता ती दोरसटवारच्या हाताला लागल्याचेदेखील तक्रारीत बुर्रेवारने नमूद केले आहे. पोलिसांनी बुर्रेवारच्या तक्रारीवरून दोरसटवारविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते.