पंचायत राज समितीचा दौरा; ३२ आमदारांसाठी ९६ अधिकाऱ्यांचा ताफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 04:10 PM2022-03-28T16:10:26+5:302022-03-28T16:23:56+5:30
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पंचायत राज समितीचा हा पहिलाच दौरा आहे.
नागपूर : राज्य शासनाची पंचायत राज समिती ७ ते ९ एप्रिलपर्यंत नागपूर दौऱ्यावर आहे. या समितीत ३२ आमदारांचा समावेश आहे. समिती सदस्यांची आवभगत करण्यासाठी ९६ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती आहे. निवासापासून ते स्वागत, भोजन व सुसज्ज वाहनांचा ताफा दिमतीला राहणार आहे. समितीसमोर कुठलीही उणीव जाणवू नये म्हणून अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत.
समिती प्रमुख डॉ. संजय रायमूलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती येत आहे. यापूर्वी दोनदा तारीख ठरल्यानंतर ही समिती काही कारणास्तव येऊ शकली नव्हती. समितीचे तीन दिवशीय भरगच्च शेड्युल्ड आहे. बैठकांसाठी शासकीय विश्रामगृह तर निवासासाठी रविभवन येथे ६५ कॉटेज बुक करण्यात आले आहेत. ही समिती पहिल्या दिवशी आढावा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्राप्त तक्रारीवरून विकासकामांना भेटी देण्याची शक्यता आहे. विशेषत: रुग्णालये व प्राथमिक शाळा टार्गेटवर राहील. २०१६ ते २०१८ या कालावधीतील आक्षेपांचे अवलोकन ते करणार आहेत. या काळात सर्वाधिक आक्षेप हे पंचायत विभाग, शिक्षण आणि बांधकाम विभागाचे असल्याची माहिती आहे. वेळेवर कुठल्याही तक्रारीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व पंचायत समित्यांच्या बीडीओंनाही अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत.
- समितीत विदर्भातील पाच आमदार
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पंचायत राज समितीचा हा पहिलाच दौरा आहे. विद्यमान समितीत विदर्भातील सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, विजय रहांगडाले यांचा समावेश आहे.