भ्रष्टाचाराची वाळवी संपवूनच देश विश्वगुरु होऊ शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 09:13 PM2022-09-22T21:13:03+5:302022-09-22T21:14:28+5:30
Nagpur News आज आपण सारे हा देश विश्वगुरू होण्याची स्वप्न पाहतोय. मात्र, देशाला वाळवीसारख्या खाणाऱ्या भ्रष्टाचाराला आधी संपविण्याची गरज आहे. आपण सारे मिळून तो संपवू शकतो, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.
नागपूर : देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. आज आपण सारे हा देश विश्वगुरू होण्याची स्वप्न पाहतोय. मात्र, देशाला वाळवीसारख्या खाणाऱ्या भ्रष्टाचाराला आधी संपविण्याची गरज आहे. आपण सारे मिळून तो संपवू शकतो. यासाठी महात्मा गांधींच्या ‘साधे जीवन उच्च विचार’ या आचरणाचे पालन करायला हवे, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.
जामठा येथील विश्व शांती सरोवर सभागृहात ब्रह्माकुमारी नागपूरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गुरुवारी झालेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती, आमदार मोहन मते, ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त प्रशासक राजयोगिनी संतोष दीदी, ब्रह्माकुमारी नागपूरच्या ब्रह्माकुमारी रजनी दीदी, कार्यकारी सचिव व शिक्षा विभाग(माउंट आबू)चे अध्यक्ष राजयोगी ब्रह्मकुमार मृत्युंजय व उपाध्यक्ष राजयोगिनी ब्रह्माकुमारी शिलु दीदी, भाजपचे कोषाध्यक्ष किरीट भन्साली, ब्रह्माकुमारीज मीडिया मुंबईचे नॅशनल समन्वयक राजयोगी निकुंज भाई, मेडिकल निदेशक राजयोगी डॉ. प्रताप मिढ्डा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुरोहित म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाने साधी जीवनशैली स्वीकारली तर गरजा मर्यादित होतील. लालसा थांबेल. या मार्गाने गेलात तर पुढच्या पाच वर्षांत देश विश्वगुरु झालेला दिसेल.
जगाच्या नजरा भारताकडे : देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगाला एकमेव भारतच नैतिक मूल्य, विचार व उत्तम भविष्य देऊ शकतो, याचा त्यांना विश्वास आहे. जगाची ही भावना लक्षात घेता आता आचरणात बदल करणे ही आपली जबाबदारी आहे. नैतिकता व मूल्य यावरच आपली संस्कृती टिकून आहे. जगात शांतता स्थापन करण्यात ब्रह्माकुमारीच्या योगदानाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
मनातील विचार आचरणात आणणे आवश्यक : विजय दर्डा
विजय दर्डा म्हणाले, समाजात महिलाच परिवर्तन घडवू शकतात. त्या परिवर्तनात पुरूषांची साथ आवश्यक आहे. आपण सारे महिला सशक्तीकरणावर बोलतो. मात्र, संपूर्ण जगात हे एकमेव संस्थान असे आहे की ज्याचे संचलन फक्त महिला करतात. जगात जेथून शांती हरवत चालली त्यांच्याकडे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बैठक नाही. भारतच जगाला शांती देऊ शकतो. ब्रह्माकुमारीजच्या नि:स्वार्थ सेवाभावाचाही त्यांनी गौरव केला.
भारताचा झेंडा जगात फडकावा : संतोष दीदी
ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त प्रशासक राजयोगिनी संतोष दीदी म्हणाल्या, नागपूर ही पुण्यभूमी आहे. येथे अनेकांचे जीवन घडले, भातृभाव वाढला आहे. समाजाची सेवा करून विश्वभावना व्यापक करणे ही आमच्या परिवाराची भावना आहे. आपण सारे एक आहोत, एकाच पित्याची लेकरे आहेत. आपणा सर्वांची भावना एक आहे. आपला सर्वांचा शुभ कार्यात सहयोग लाभला तर हे जग सुखी करण्यास वेळ लागणार नाही.
यांचा झाला सत्कार
मागील ४० ते ५० वर्षांपासून निरंतर सेवा देणाऱ्या सीता दीदी (अमरावती), इंद्रा दीदी (अमरावती), बिंदु दीदी (वरुड), रत्नमाला दीदी (गोंदिया), मंगला दीदी (यवतमाळ), जयमाला दीदी (हिंगणघाट), नलिनी दीदी (गडचिरोली), शोभा दीदी (भंडारा), रुक्मिणी दीदी (अकोला) यांचा समारंभादरम्यान सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी ‘कौन कहते हैं भगवान आते नही’ हे भजन गायले.
...