अन् मृत रानडुकराला वाहनामागे बांधून दीड किलोमीटर नेले फरफटत; व्हीडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 10:41 AM2022-02-14T10:41:28+5:302022-02-14T10:50:37+5:30

या महामार्गावरून जाणाऱ्या नागपुरातील एका नागरिकाच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

a dead wild boar tied back to the vehicle and dragged about 1.5 km | अन् मृत रानडुकराला वाहनामागे बांधून दीड किलोमीटर नेले फरफटत; व्हीडिओ व्हायरल

अन् मृत रानडुकराला वाहनामागे बांधून दीड किलोमीटर नेले फरफटत; व्हीडिओ व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील घटना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

नागपूर : मृत जंगली रानडुकराला वाहनामागे बांधून जवळपास दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे रामटेक वन परिक्षेत्र परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वन्यजीव प्रेमींनी या व्हिडिओच्या आधारावरून तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या महामार्गवरून जाणाऱ्या एका कार चालकाने या घटनेचा मोबाइलवरून व्हिडिओ बनविला होता. तो व्हायरल झाल्यावर मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटाकर यांच्यापर्यंत पोहचला. त्यांनी शनिवारी उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा यांच्याकडे तक्रार करून तो व्हिडिओ सादर केला. यानंतर एसीएफ नरेंद्र चांदेवार, आरएफओ रितेश भोंगाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने तपास केला. यात खुमारी येथील ओरियंटलच्या टोल नाक्यावरील पेट्रोलिंग वाहनाने रानडुकराला फरफटत नेल्याचे उघड झाले.

टोल नाक्याच्या आपत्कालिन संपर्क क्रमांकावर एका व्यक्तीने खुमारीजवळील मार्गावर रानडुक्कर मरून पडले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पेट्रोलिंग वाहन (क्रमांक एमएच/४०/बीजी/७१३८) च्या चालकाने मृत डुकराला वाहनामागे दोरीने बांधून फरफटत नेले आणि जंगलात टाकून दिले. वन विभागाच्या पथकाने संबंधित चालक गणेश गणपतराव बगमारे (४२, वडांबा) याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले.

नागरिकाच्या दक्षतेमुळे घटना उघडकीस

या महामार्गावरून जाणाऱ्या नागपुरातील एका नागरिकाच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनीही अशा प्रकरणात दक्षता बाळगावी. महामार्गावर एखादा प्राणी मृतावस्थेत किंवा जखमी अवस्थेत आढळल्यास वन विभागाला सूचित करणे आवश्यक असते. मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर यांनी मृत वन्य प्राण्याची ही विटंबना असून क्रूरपणाचे कृत्य असल्याचे म्हटले आहे.

Web Title: a dead wild boar tied back to the vehicle and dragged about 1.5 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.