ट्रकचालकाकडे ४०० रुपयांची मागणी; दोन दलालांसह महिला मोटार वाहन निरीक्षक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 09:55 PM2023-05-05T21:55:39+5:302023-05-05T21:56:07+5:30
Nagpur News ट्रकचालकाकडून ४०० रुपयांची वसुली करणारे दोन दलाल आणि त्यांची नेमणूक करणाऱ्या मोटार वाहन निरीक्षक यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्या आहेत.
नागपूर : ट्रकचालकाकडून ४०० रुपयांची वसुली करणारे दोन दलाल आणि त्यांची नेमणूक करणाऱ्या मोटार वाहन निरीक्षक यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्या आहेत. तिघांविरुद्ध रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु कारवाईची शंका आल्यामुळे तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या कारवाईमुळे आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मोटार वाहन निरीक्षक गीता भास्कर शेजवळ असे आरटीओतील महिला अधिकाऱ्याचे नाव आहे; तर मुकुंद सोनकुसरे आणि राजेश भातखोरे ही शेजवळ यांनी नियुक्त केलेल्या दोन दलालांची नावे आहेत. कांद्री सीमा तपासणी नाक्यावर ४ मे रोजी मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ कर्तव्यावर होत्या. दरम्यान, तक्रारकर्त्या व्यक्तीचा ट्रक पास करण्यासाठी दोन्ही दलालांनी ४०० रुपये लाचेची मागणी केली. यावेळी यवतमाळ ‘एसीबी’चे पथक घटनास्थळी हजर होते; परंतु ‘एसीबी’च्या कारवाईची शंका आल्यामुळे मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि दलाल मुकुंद सोनकुसरे व राजेश भातखोरे हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले.
लाचेची मागणी केल्याप्रकरणी या तिघांविरुद्ध रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ‘एसीबी’ अमरावतीचे अधीक्षक मारोती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळचे उपअधीक्षक शैलेश सपकाळ, नीलेश पखाले, अतुल मते, वसीम शेख, सचिन भोयर, महेश वाकोडे, मनीष राजूरकर, उपनिरीक्षक सुधाकर कोकेवार, उपनिरीक्षक संजय कांबळे यांनी केली. दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या संबंधित मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांचे पतीही मोटार वाहन निरीक्षक असून त्यांच्यावरही ९ फेब्रुवारी २०२३ रोजी कांद्री येथेच ‘एसीबी’चा ट्रॅप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
............