१ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर विनाखर्चात होणार प्रक्रिया; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नेदरलॅण्ड कंपनीसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 01:42 PM2022-11-14T13:42:19+5:302022-11-14T13:49:36+5:30
नागपूरसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार
नागपूर : महापालिकेला एक रुपयाही खर्च न करता, भांडेवाडीत रोज डम्प होणारा १ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर रिसायकलिंग प्रक्रिया करण्यासाठी नेदरलॅण्ड कंपनीने तयारी दर्शविली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नेदरलॅण्डच्या कंपनीच्या प्रतिनिधीसोबत रविवारी बैठक झाली. यावेळी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. उपस्थित होते.
प्रकल्पासंदर्भात महापालिका प्रशासन व नेदरलॅण्ड कंपनीच्या दरम्यान लवकरच करार होण्याचे संकेत आहे. मनपाला यासाठी एक रुपयाही कंपनीला द्यायचा नाही. नेदरलॅण्डच्या एसयूएसबीडीई कंपनी स्वत: प्रकल्प तयार करून, त्यावर जो खर्च होईल, तो स्वत:च करणार आहे. प्रकल्प संचालित करण्यासोबतच त्याची देखभालही कंपनीच करणार आहे. बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूरसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. वर्षभरात हा प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहे. बैठकीत कंपनीचे अध्यक्ष जॉप विनेनबॉस, आमदार प्रवीण दटके, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी उपस्थित होते.
- कचऱ्यापासून पुन्हा उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे होणार उत्पादन
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भांडेवाडी येथील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेतून अक्षय ऊर्जा, बायो सीएनजी, बायोगॅस, खत व पुन्हा उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्यात येईल.