गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरात बनावट खाद्यतेलाच्या रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:20 PM2022-08-30T23:20:31+5:302022-08-30T23:20:48+5:30
लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मिर्ची बाजार येथे शंकर ट्रेडर्स या कारखान्यात बनावट तेल बनत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
नागपूर : ऐन सणासुदीच्या काळात तेलाची मागणी वाढत असताना ब्रॅंडेड कंपन्यांच्या नावावर बनावट तेल विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे. अशाच एका कारखान्यावर मंगळवारी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली व १ हजार ९०० लीटर बनावट तेल जप्त केले.
लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मिर्ची बाजार येथे शंकर ट्रेडर्स या कारखान्यात बनावट तेल बनत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. तेथील तेलाच्या डब्यांचा शहरातील अनेक दुकानांमध्ये पुरवठा होत होता. संबंधित माहितीची चाचपणी केल्यानंतर मंगळवारी तेथे धाड टाकण्यात आली. कारखान्यात दोन ब्रॅंडेड कंपन्यांचे लेबल असलेल्या टिनाच्या डब्यांमध्ये बनावट सोयाबीन तेल टाकण्यात येत होते. गुन्हे शाखेच्या पथकाने हजार लीटरहून अधिक बनावट तेल, टिनाचे डब्बे तसेच ब्रॅंडेड कंपन्यांचे बनावट लेबल्स असा २ लाख ७७ हजारांचा माल जप्त केला.