फ्लॅटविक्रीच्या नावाखाली बनावट मालकाचा अकोल्यातील व्यापाऱ्याला एक कोटींचा गंडा
By योगेश पांडे | Published: August 2, 2023 05:33 PM2023-08-02T17:33:05+5:302023-08-02T17:39:17+5:30
रिॲलिटी फर्मच्या प्रोप्रायटरविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : जमिनीचा मालक असल्याची बतावणी करत ग्राहकाला फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने अकोल्यातील व्यापाऱ्याला तब्बल एक कोटींचा गंडा घालण्यात आला. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
संतोष जुगलकिशोर लाहोटी (४५, नवरंग पार्क, अकोला) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जी.बी.रिएलटर्सचा प्रोप्रायटर संतोषकुमार नंदकुमार गंदेवार (४२, श्रीनगर, अजनी) याने लाहोटी यांना छत्रपती चौकातील ३,३८० चौरस मीटर जागेचा मालक असल्याचे सांगत तेथे अपार्टमेंट बांधत असल्याचे सांगितले. तेथील सी.एस.टी.अपार्टमेंटमध्ये नवव्या माळ्यावर १९०० चौरस फूट जागेत फ्लॅट देण्याचा दावा त्याने केला. त्याच्यावर विश्वास ठेवून नोव्हेंबर २०१७ साली लाहोटी यांनी १.३० कोटींची गुंतवणूक केली. मात्र गंदेवारने त्यांना बांधकाम करून दिले नाही. तो वारंवार टाळाटाळ करत होता.
लाहोटी यांनी चौकशी केली असता ती मालमत्ताच गंदेवारच्या नावावर नसल्याची बाब समोर आली. त्यानंतर लाहोटी यांनी त्याला पैसे वापस मागितले असता त्याने एप्रिल २०२३ मध्ये त्यांना ३० लाख रुपये परत केले. मात्र एक कोटी रुपये परत करण्यास तो परत टाळाटाळ करू लागला. अखेर लाहोटी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात गंदेवारविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.