नागपूरच्या अंबाझरी तलावात सापडला पाण्यावर तरंगला पाच किलाेचा दगड!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 05:54 AM2022-11-06T05:54:59+5:302022-11-06T05:55:19+5:30
दगडाची घनता पाण्यापेक्षा अधिक असते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ताे बुडताे. मात्र, नागपूरच्या अंबाझरी तलावात पाच ते सहा किलाेचा माेठा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले.
निशांत वानखेडे
नागपूर :
दगडाची घनता पाण्यापेक्षा अधिक असते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ताे बुडताे. मात्र, नागपूरच्या अंबाझरी तलावात पाच ते सहा किलाेचा माेठा दगड चक्क पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. तरंगणाऱ्या दगडाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल हाेत असून, हा दगड कुतूहलाचा विषय ठरला आहे.
नागपूरचे स्विमिंग काेच संजय बाटवे अंबाझरी तलावावर काेचिंगसाठी गेले हाेते. साफसफाई करताना एक दगड अचानक तलावात पडला. मात्र, हा दगड बुडण्याऐवजी तरंगायला लागला. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी ताे दगड पुन्हा काढला आणि दुसऱ्या भागात फेकला. काही वेळ बुडात जाऊन ताे पुन्हा वर आला. त्यांनी या दगडाचा व्हिडीओ बनविला आणि मित्रांच्या ग्रुपवर टाकला. पाहता-पाहता तो वाऱ्यासारखा पसरला आणि दगड पाहण्यासाठी गर्दी जमू लागली. दगडाची तुलना थेट रामसेतूशी जाेडली गेली.
वालुकामय खडक की सिमेंटमिश्रीत दगड?
स्वत: भूगाेल विषयात एमए असलेल्या बाटवे यांना मात्र फारसे आश्चर्य वाटले नाही. पाच-सहा किलाे वजनाचा हा दगड वालुकामय किंवा सिमेंटमिश्रीत खडक असू शकताे. वालुकामय दगडाच्या आत कालांतराने पाेकळी निर्माण हाेते व त्यात गॅस भरल्यामुळे कधी-कधी हे खडक पाण्यावर तरंगतात.
हा सिमेंटमिश्रीत दगडही असू शकताे. छठपूजेसाठी कुणीतरी आणला असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
प्रत्यक्ष दगड पाहिल्याशिवाय काही सांगणे शक्य नाही. कोराडी परिसरात रांगाेळी तयार करण्यासाठी उपयाेगात येणारे खडक आहेत. हे खडक काही काळ पाण्यावर तरंगत राहू शकतात. रामसेतूमुळे चर्चेत असलेला ‘पुमाइस’ प्रकारचा दगड किंवा खडक नागपूर परिसरात आढळत नाही.
- आर.एच. चव्हाण, अधिकारी, भूगर्भ सर्वेक्षण विभाग