मावशीला बोलवायला रस्त्यावर गेलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याला कारने चिरडले

By योगेश पांडे | Published: April 29, 2024 05:43 PM2024-04-29T17:43:00+5:302024-04-29T17:45:21+5:30

Nagpur : लग्नाच्या रिसेप्शनला गेलेल्या कुटुंबावर आघात

A five-year-old boy was crushed by a car while on the road to call his aunt | मावशीला बोलवायला रस्त्यावर गेलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याला कारने चिरडले

Accident of a five year old boy in the wedding reception

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
एका लग्नाच्या स्वागत समारंभात गेलेल्या दांपत्याला त्यांचा पाच वर्षीय चिमुकला अपघातात गमवावा लागला. मावशीला बोलविण्यासाठी लॉनमधून रस्त्यावर गेलेल्या चिमुकल्याला रॉंगसाईडने आलेल्या भरधाव कारने चिरडले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

चिरायू अनोद पवार (५, राजीवनगर, वडधामना) असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे आईवडील त्याचा मोठा भाऊ लक्ष्य याच्यासह नातेवाईकांच्या घरच्या रिसेप्शनसाठी वेळाहरी मार्ग, बेसा येथील करण लॉनमध्ये गेले होते. त्याचे पालक नातेवाईकांसोबत बोलत असताना चिरायू हा त्याच्या मावशीला आवाज देण्यासाठी बाहेर गेला. त्यावेळी एमएच ४९ बीआर ४९१२ ही कार रॉंग साईडने वेगात आली व चिरायू त्याच्याखाली आला. कारचालक योगेश दामोदर मोहाडीकर (४२, शिव एलाईट टाऊनशीप, शंकरपूर) याने करकचून ब्रेक दाबले. मात्र चिरायू गंभीर जखमी झाला. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहताच एकच हलकल्लोळ उडाला. त्याच्या छाती व डोक्याला गंभीर मार बसला होता. त्याचे वडील व मामा त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी कारचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

रिसेप्शनमध्ये पसरली शोककळा
लॉनच्या बाहेर झालेल्या अपघाताची माहिती आत कळताच सर्वांनी बाहेर धाव घेतली. समोरील दृश्य पाहून अनेक जण संतापले व कारचालकाला घेरण्यात आले. यामुळे तणाव निर्माण झाला होता. काही क्षणांअगोदर हसताखेळता असणारा व बोबडे बोल बोलत सर्वांशी बोलणारा चिरायू आपल्यात नाही ही कल्पनाच नातेवाईकांना सहन होत नव्हती.

 

Web Title: A five-year-old boy was crushed by a car while on the road to call his aunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.