गेम खेळण्यासाठी पाच वर्षाच्या मुलाला मोबाईल देणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2022 08:02 PM2022-11-07T20:02:10+5:302022-11-07T20:02:33+5:30
Nagpur News पाच वर्षांच्या मुलाला गेम खेळण्यासाठी स्वत:चा मोबाईल देणे एका महिलेला प्रचंड महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी ७८ लाखांची रक्कम बॅंक खात्यातून लंपास केली.
नागपूर : पाच वर्षांच्या मुलाला गेम खेळण्यासाठी स्वत:चा मोबाईल देणे एका महिलेला प्रचंड महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी ७८ लाखांची रक्कम बॅंक खात्यातून लंपास केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
एमआयडीसीतील माधव नगरी येथे राहणाऱ्या मोना विजय मुदर्ले यांचा पाच वर्षीय मुलगा ३ नोव्हेंबर रोजी दुपारी मोबाईलवर गेम खेळत होता. मोना यांना त्यांचा मुलगा कोणाशी तरी मोबाइलवर बोलताना दिसला. मोनाने मुलाकडून मोबाईल घेतला. मुलगा अनोळखी व्यक्तीशी बोलत होता.
त्या व्यक्तीने मोनाला कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी केली. तुमच्या मुलाने एनी डेस्क ॲप घेतले असून त्याची लिंक मोनाला पाठवायला सांगितली. कुठल्याही ‘कस्टमर केअर’कडून अशी माहिती विचारत नाही, असे सांगून मोना यांनी फोन कट केला. मात्र, काही वेळातच मोना यांना त्यांच्या एका खात्यातून ७० हजार रुपये व दुसऱ्या खात्यातून ८ हजार रुपये वळते झाल्याचा एसएमएस आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोना यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.