नागपुरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस, पाच वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले

By योगेश पांडे | Published: November 8, 2023 10:26 PM2023-11-08T22:26:20+5:302023-11-08T22:26:28+5:30

मनपा प्रशासन मुलांचा जीव जाण्याची वाट पाहणार का ? : गल्लोगल्ली कुत्र्यांची दहशत

A five-year-old girl's cut off by stray dogs in Nagpur | नागपुरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस, पाच वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले

नागपुरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस, पाच वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले

नागपूर: मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत नागपूर महानगरपालिकेचा हलगर्जीपणा परत एकदा उघड झाला असून कुत्र्यांच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय मुलीचा जीव जाता जाता वाचला. कुत्र्यांनी घरासमोरच खेळणाऱ्या मुलीवर हल्ला करत अक्षरश: तिच्या कंबरेचे लचके तोडले. मुलीला संपूर्ण शरीरावर एकूण १३ टाके पडले असून या प्रकारामुळे ती प्रचंड धास्तावली आहे. सोनेगाव येथील शिवविहार सोसायटी येथे ही घटना घडली असून मनपा प्रशासन व अधिकाऱ्यांकडून या भागाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

मनवा पंकज गुजर असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ती सायंकाळी घरासमोरच तिच्या मोठ्या बहिणीसोबत खेळत होती. साडेसहा वाजताच्या सुमारास खेळणे झाल्यावर ती बहिणीचा हात पकडून रस्ता ओलांडून घरी जात असताना चार ते पाच कुत्रे भुंकत तिच्या दिशेेने आले व दोन्ही बहिणींवर हल्ला केला. मोठी बहीण सुरक्षित ठिकाणी जाण्यात यशस्वी झाली. मात्र मनवा खाली पडली व कुत्र्यांनी तिला चावे घेतले. तिच्या कंबरेचे अक्षरश: लचके तोडले. तिच्या शरीरावर दोन इंचापर्यंतच्या खोल जखमा झाल्या. तिच्या किंकाळ्या ऐकून तिची आई लतिका, व शेजारच्या व्यक्तींनी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत तिला तातडीने इस्पितळात नेण्यात आले. तेथे तिला टाके लावण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण होते. या परिसरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. मनपा प्रशासनाला अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र कुणीच काही पावले उचलली नाही, अशी नागरिकांची ओरड आहे.

मोकाट कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचीदेखील दहशत
मनवावर हल्ला करणाऱ्यांमध्ये दोन पाळीव कुत्रेदेखील होते. या परिसरातील काही मुजोर लोकांकडून कुत्रे तर पाळण्यात येतात, मात्र त्यांच्या गळ्यात पट्टे घालून कुत्रे बाहेर सोडण्यात येतात. हे कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर भुंकतात किंवा हल्ला करतात. यामुळे अपघाताचादेखील धोका संभवतो. या परिसरातील काही धनदांडगे शिवविहार सोसायटीत कुत्रे फिरायला आणतात व तेथेच त्यांचा प्रातर्विधी उरकतात. त्यांना टोकल्यावर मोठे ‘कॉन्टॅक्ट’ असल्याची भिती दाखवून सामान्यांना चूप करवतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.

Web Title: A five-year-old girl's cut off by stray dogs in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.