आजूबाजूला पोलिसांचा ताफा अन् एक असहाय रुग्णवाहिका !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 02:59 PM2023-08-05T14:59:59+5:302023-08-05T15:01:12+5:30
आंखों देखी ... तारीख : ४ ऑगस्ट, वेळ : दुपारी ३ वाजताची
विकास मिश्र
नागपूर : वर्धा मार्गाने उपराजधानीत येणाऱ्या वाहन चालकांनी चिंचभवन परिसरात वाहतूक पोलिसांचा ताफा पाहून कुणी तरी अतिमहत्त्वाची व्यक्ती येत-जात असावी, असा अंदाज बांधला. मात्र, जसजसे वाहनधारक चिंचभवन आणि विमानतळादरम्यान असलेल्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशस्त उड्डाणपुलावर चढले तसे त्यांना समोर ट्रॅफिक जाम दिसली. ट्रॅफिक जाम हा शहरासाठी काही नवीन विषय नाही. अलीकडे रोजच अन् वारंवार वेगवेगळ्या भागात ट्रॅफिक जाम होतच राहते. मात्र, आज अडचण त्यावेळी निर्माण झाली ज्यावेळी मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेला समोर जाण्यासाठी जागाच मिळाली नाही.
रुग्णवाहिका चालक सलग त्याचा भोंगा वाजवत होता. त्यामुळे इमर्जन्सी असल्याचे समोरच्या सर्वच वाहनधारकांना कळत होते. मात्र, ते तरी काय करणार, जाम लांबलचक होता. पुढे किंवा बाजूला सरकायला जागाच नव्हती. त्यामुळे काही वाहनचालकांनी रुग्णवाहिका चालकाला मागे फिरून चिंचभवनकडून मनीषनगर मार्गे जाण्याचा सल्ला दिला. चालकाला रस्ता माहिती होता. मात्र, तो मागे वळण्याच्या तयारीत असतानाच पुन्हा तेच झाले. मागेही वाहनांची लांबलचक रांग लागली होती. त्यामुळे रस्ता मिळावा म्हणून रुग्णवाहिकेचा भोंगा सारखा वाजत राहिला.
सुमारे २० मिनिटे होऊनही त्याला पुढे मागेच काय, आजूबाजूला सरकण्यासाठीही जागा मिळाली नाही. रुग्णवाहिकेत कुणी रुग्ण नव्हता. मात्र, रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी कामी येणारे ऑक्सिजन सिलिंडर होते. अर्थात् लवकर रुग्णवाहिका यावी म्हणून कुणीतरी तिकडे प्रार्थना करीत होते. मात्र, आपण वेळेवर पोहोचू शकणार नाही, याची रुग्णवाहिका चालकाला कल्पना आली. परिणामी वेळेचे भान राखत त्याने रुग्णालयात फोन करून ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याने लवकर येणे होणार नाही, याची संबंधितांना कल्पना दिली.
दरम्यान, काही वेळानंतर ट्रॅफिक सुरू झाले. हळूहळू गाड्या सरकू लागल्या. अशा वेळी रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी वाहनधारक मार्ग देतील, अशी भाबडी अपेक्षा होती. मात्र, कसले काय. रुग्णवाहिकेला जागा देण्याऐवजी जो तो दाटीवाटीने आपली गाडी पुढे दामटण्याच्या प्रयत्नात पुढे, आजूबाजूला सरकू लागला. हे दृश्य अस्वस्थ करणारे होते. नागपूरसारख्या समजदार लोकांच्या शहरात अशी असंवेदनशीलता कशी रुजत आहे, असा प्रश्न सतावू लागला.
दरम्यान, जागा मिळाली आणि रुग्णवाहिकाचालक समोर निघूनही गेला. मात्र, अनेक प्रश्न मागे सोडून गेला. मुद्दा असा आहे की, नागपूर शहरात रस्ते एवढे प्रशस्त बनले आहे की 'इमर्जन्सी लेन'ची जागा नक्कीच सुरक्षित ठेवली जाऊ शकते. मात्र, ही 'इमर्जन्सी लेन' का नाही, व्हीआयपीच्या आगमनाच्या वेळी एवढे सर्व अधिकारी, कर्मचारी तैनात असतात, रुग्णवाहिकेसाठी रस्त्याचा एक भाग सुरक्षित ठेवण्याचे ते भान का राखत नाही, एवढे सारे अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात असताना रस्त्यावर वाहनांच्या चार-चार रांगा कशा लागतात, असाही प्रश्न पडला. रुग्णवाहिकेसोबत उपरोक्त प्रकार पहिल्यांदा झाला, असे नाही. शहरातील मान्यवर नेते आणि आदरणीय अधिकाऱ्यांनी या प्रश्नाचा अगत्याने विचार करावा.