दीक्षाभूमीवर चारदिवसीय बुद्ध महोत्सव; ४ मेपासून सुरुवात; शंभर बालकांना श्रामणेरची दीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 07:25 PM2023-04-29T19:25:08+5:302023-04-29T19:26:11+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे चारदिवसीय बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला ४ मेपासून सुरुवात होईल.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे चारदिवसीय बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला ४ मेपासून सुरुवात होईल. पहिल्या दिवशी बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ वाजता शंभर बालकांसह ज्येष्ठांनाही श्रामनेरची दीक्षा दिली जाणार आहे, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्म सेनानायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली.
या कार्यक्रमाला बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रमुख भदन्त धम्मसारथी, भंते नागसेन थेरो, संघप्रिया महाथेरो, भंते धम्मबोधी, भंते भीमा बोधी उपस्थित राहतील. श्रामणेर दीक्षा घेऊन तथागत बुद्धांचा धम्म अनुसरण्याचा निर्धार करतील. श्रामणेर यांचे निवासी प्रशिक्षण दीक्षाभूमी स्मारक समितीच्या उंटखाना शाखेतील बुद्धिस्ट सेमिनरीत होईल. पाचदिवसीय शिबिरादरम्यान भदन्त धम्मसारथी बुद्ध, धम्म आणि संघ याविषयी मार्गदर्शन करतील.
भदन्त ससाई यांच्या अध्यक्षतेखाली ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भदन्त नागवंश, भदन्त धम्मप्रकाश, भिक्खूनी संघप्रिया, नागकन्या, शीलानंदा आदींसह भिक्खू संघ करुणा, शांती, मैत्री आणि बुद्धाचा कल्याणाचा मार्ग यावर प्रवचन करतील. ६ मे रोजी प्रबुद्ध साठे, डॉ. यशवंत मनोहर, आचार्य वानखेडे आणि स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले मार्गदर्शन करतील. ७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता सूरमनी प्रभाकर धाकडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात प्रा. अनिल खोब्रागडे, छाया वानखेडे यांच्यासह इतर गायक-कलावंत गीत सादर करतील.
बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, शाखा उंटखाना येथील बुद्धिस्ट सेमिनरीच्या वर्धापन दिनानिमित्त १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. सुधीर फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भदन्त धम्मसारथी यांच्या हस्ते होईल.