पत्नीला वादग्रस्त बाेलल्याने मित्राची गाेळी झाडून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2023 08:20 PM2023-01-09T20:20:42+5:302023-01-09T20:22:45+5:30
Nagpur News पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने मित्राला रविवारी (दि. ८) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घरी बाेलावून त्याच्याशी पत्नी व इतर मित्रांसमाेर भांडायला सुरुवात केली. पत्नी चिडताच त्याने मित्रावर पिस्तूल राेखले आणि दाेन गाेळ्या झाडून त्याची हत्या केली.
नागपूर : पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने मित्राला रविवारी (दि. ८) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घरी बाेलावून त्याच्याशी पत्नी व इतर मित्रांसमाेर भांडायला सुरुवात केली. पत्नी चिडताच त्याने मित्रावर पिस्तूल राेखले आणि दाेन गाेळ्या झाडून त्याची हत्या केली. ही घटना हिंगणा शहरात घडली असून, आराेपी फरार असल्याने त्याचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार विशाल काळे यांनी दिली.
अविनाश अशोक घुमडे (३२, रा. पंचवटी पार्क, हिंगणा) असे मृताचे तर, दीपक घनचक्कर ऊर्फ खट्या (३८, रा. श्रीकृष्णनगर, हिंगणा) असे फरार आराेपीचे नाव आहे. अविनाश व दीपक मित्र असून, हिंगण्यात राहायला आल्यानंतर त्या दाेघांची मैत्री घट्ट झाली. अविनाशने काही दिवसांपूर्वी दीपकच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. याबाबत कळताच दीपकने त्याच्या पत्नीला विचारणा केली हाेती. त्यातच त्याने रविवारी रात्री अविनाशला त्याच्या घरी बाेलावले. वंश ढगे (१८) नामक तरुणाला साेबत घेऊन अविनाश दीपकच्या घरी पाेहाेचला.
दीपकने त्याच्या तीन-चार साथीदार व पत्नीसमाेर अविनाशसाेबत भांडायला सुरुवात केली. त्यातच दीपकची पत्नी अविनाशवर सर्वांसमाेर चिडताच दीपकने त्याच्यावर पिस्तूल राेखले आणि दाेन गाेळ्या झाडल्या. दाेन्ही गाेळ्या छातीत शिरताच अविनाश काेसळला आणि वंशने तिथून पळ काढला. दीपक व त्याच्या साथीदारांनी वंशला शाेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ताे दीपकला सापडला नाही.
पाेलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी अविनाशला हिंगणा शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपुरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पाेलिस आयुक्त अमितेशकुमार, सहपाेलिस आयुक्त अस्वती दाेरजे, उपायुक्त अनुपकुमार जैन यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी मृत अविनाशचे वडील अशाेक यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून आराेपीचा शाेध सुरू केला आहे.
जीवाला धाेका असल्याने हिंगण्यात आश्रय
अविनाश घुमडे व दीपक खट्या आधी नागपुरातील मानकापूर भागात राहायचे. या भागात त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले हाेते. शत्रूंपासून जीवितास धाेका असल्याने दाेघांची मैत्री झाली. जीव वाचविण्यासाठी दीपक कुटुंबीयांसह काही महिन्यांपूर्वी हिंगण्यात राहायला आला हाेता. त्याने अविनाशलाही हिंगण्यात राहायला आणले. दाेघेही किरायाने राहायचे. दीपक गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, अविनाशवर गुन्ह्यांची नाेंद नाही, अशी माहिती पाेलिस अधिकाऱ्यांनी दिली.
वंशने गाठले पाेलिस ठाणे
वंश ढगे हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याने घटनास्थळाहून पळ काढत लगेच हिंगणा पाेलिस ठाणे गाठले. सहायक पोलिस निरीक्षक गजानन तेलरांधे यांना संपूर्ण हकीकत सांगितली. सुरुवातीला त्यांचा वंशच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. पाेलिसांनी वंशला साेबत घेऊन घटनास्थळ गाठले. ताेपर्यंत आराेपी तिथून पळून गेले हाेते तर खाेलीत अविनाश रक्ताच्या थाराेळ्यात पडून हाेता.
...