भुकेने व्याकुळलेल्या जखमी बिबट्याचा सुराबर्डीच्या जंगलात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 11:13 AM2022-03-04T11:13:02+5:302022-03-04T11:17:51+5:30

जखमी अवस्थेतील त्या बिबट्याला गावकऱ्यांनी आणि वन कर्मचाऱ्यांनी जंगलात भटकत असताना पाहिल्याचीही माहिती आहे. मात्र गुरुवारी तो मृतावस्थेत आढळला.

a full-grown leopard found dead in surabardi forest | भुकेने व्याकुळलेल्या जखमी बिबट्याचा सुराबर्डीच्या जंगलात मृत्यू

भुकेने व्याकुळलेल्या जखमी बिबट्याचा सुराबर्डीच्या जंगलात मृत्यू

Next
ठळक मुद्देजखमी अवस्थेत फिरताना आढळूनही झाले नाही वाचविण्याचे प्रयत्न

नागपूर : काही दिवसांपूर्वी आपसी झुंजीत जखमी झालेल्या एका बिबट्याचा बुट्टीबोरी वनपरिक्षेत्रातील सुराबर्डीच्या जंगल परिसरात मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्याला या परिसरात जखमी अवस्थेत फिरताना गावकरी आणि वनकर्मचाऱ्यांनीही पाहिले होते. तरीही त्याला वेळीच रेस्क्यू वाचविण्याचे प्रयत्न का झाले नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

गुरुवारी सकाळी ७.३० वाजता बिबट्याच्यामृत्यूची ही घटना निदर्शनास आली. वन कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना कक्ष क्रमांक ३१४ मध्ये बिबट मृतावस्थेत पडलेला दिसून आला. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनीही घटनास्थळाला भेट दिली. हा बिबट काही दिवसांपूर्वी अन्य प्राण्यासोबत झालेल्या झुंजीत जखमी झाला होता, अशी माहिती वन कर्मचाऱ्यांना आहे. नंतरच्या काळात जखमी अवस्थेत त्याला या परिसरात गावकऱ्यांनी आणि वन कर्मचाऱ्यांनी जंगलात भटकत असताना पाहिल्याचीही माहिती आहे. मात्र गुरुवारी तो मृतावस्थेत आढळला.

भुकेने व्याकुळलेला आणि जखमी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. एसीएफ नरेंद्र चांदेवार, आरएफओ एल. व्ही. ठोकळ, डॉ. प्रमोद सपाटे, डॉ. स्मिता रामटेके, डॉ. मुगाली महल्ले, मानद वन्यजीव रक्षक उधमसिंह यादव, शुभम राऊत यांची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाचविण्याची धडपड नाही?

वन विभागाकडे अत्याधुनिक रेस्क्यू सेंटर आहे. गोरेवाडा येथेही प्राण्यांवर उपचार करण्याची सुविधा आहे. असे असतानाही जखमी अवस्थेत फिरणाऱ्या बिबट्याला वाचविण्याचे फारसे प्रयत्न झाले नाही. त्यामुळेच भुकेने व्याकूळ होऊन त्याचा मृत्यू झाला. वन कर्मचाऱ्यांच्या आणि विभागाची ही टाळाटाळ चर्चेचा विषय आहे.

Web Title: a full-grown leopard found dead in surabardi forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.