रेशनधारकांकडून धान्य खरेदी करणाऱ्या टोळीचा भंडाफोड; ४ लाख ७ हजारांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 05:19 PM2022-11-23T17:19:42+5:302022-11-23T17:23:54+5:30
चढ्या दराने करायचे विक्री : मोठे रॅकेट असण्याची शक्यता
नागपूर : गरीब-वंचित कुटुंबातील नागरिकांना स्वस्त दरात धान्य मिळावे यादृष्टीने सरकारकडून त्यांना रेशन दुकानांच्या माध्यमातून धान्यपुरवठा करण्यात येतो. मात्र, अशा नागरिकांना ‘टार्गेट’ करून त्यांच्याकडून धान्य खरेदी करत ते चढ्या दराने विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ते वस्त्या-वस्त्यांमध्ये मालवाहतुकीचे वाहन घेऊन धान्य खरेदी करायचे. तहसील पोलिस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली.
तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत टिमकी येथे काही लोक झोपडपट्टी व गरिबांच्या वस्तीत फिरून धान्य विकत घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस हवालदार लक्ष्मण शेंडे यांनी काही लोकांना असे करत असताना पाहिले व त्यांनी पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने चार जणांना रंगेहाथ अटक केली. त्यात अभय पुंडलिक डायरे (जागनाथ बुधवारी), अकबर खान ऊर्फ इब्राहीम खान (बंगालीपंजा), तनवीर शेख ऊर्फ शब्बीर शेख (शांतीनगर) व कैफ (यशोधरानगर) यांचा समावेश होता. हे चौघे दोन तीनचाकी मालवाहतूक वाहन घेऊन परिसरात फिरत होते. त्यांच्याकडून ७७ पोते तांदूळ व गहू जप्त करण्यात आला. याशिवाय त्यांच्याकडे वजन काटा, पोते शिवणारी मशीन, वाहने असा एकूण ४ लाख ७ हजारांचा माल जप्त करण्यात आला. याची माहिती लगेच अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाला देण्यात आली. अन्नधान्य वितरण अधिकारी अभिमन्यू चऱ्हाटे यांच्या तक्रारीवरून चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रधाराचा शोध सुरू
हे चारही आरोपी गरीब वस्त्यांमध्ये फिरून तेथील नागरिकांकडून रेशनचे धान्य विकत घ्यायचे. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा संशय आहे. यांच्या मागचा सूत्रधार कोण आहे व किती काळापासून हा प्रकार सुरू होता, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बड्या व्यापाऱ्यांच्या संपर्कात
सरकारी रेशनच्या काळाबाजाराचे तार दूरवर जोडलेले आहेत. ही टोळी गरिबांकडून धान्य खरेदी करते व एक-दोन रुपयांच्या नफ्यावर लहान दुकानदारांना विक्री करते. हे दुकानदार मोठ्या व्यापाऱ्यांना विक्री करतात. ही साखळी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.