कब तक बचेगा, आज इसका मर्डरही करते है... कुटुंबासमोरच चाकूने वार
By योगेश पांडे | Published: September 8, 2023 02:53 PM2023-09-08T14:53:08+5:302023-09-08T14:53:41+5:30
मेकोसाबागेत तरुणांच्या टोळक्याकडून कुटुंबियांसमोर तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न
नागपूर : जुन्या शत्रुत्वातून तरुणांच्या एका टोळक्याने घरासमोर शतपावली करणाऱ्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींना शिवीगाळ केल्याबाबत जाब विचारल्यावरून वाद वाढला व ‘कब तक बचेगा, आज इसका मर्डरही करते है‘ असे म्हणत आरोपींनी त्याच्या डोक्यावर चाकूने वार केले. संबंधित विवाहित तरुणाच्या कुटुंबियांसमोरच हा प्रकार घडला. ऐनवेळी वस्तीतील लोक धावून आल्याने अनर्थ टळला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
डेव्हीड पटेल (२९, ख्रिश्चन कॉलनी, मेकोसाबाग) असे जखमीचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास तो जेवण झाल्यावर पत्नी नैनसी व कुटुंबियांसह शतपावली करत होता. त्याच्याच वस्तीत राहणाऱ्या शुभम कोटांगळेसोबत (२६) कोरोना काळात त्याचा वाद झाला होता. शतपावली करत असताना काही अंतरावर शुभम हा त्याचे वस्तीतीलच मित्र प्रविण चव्हाण (२५), प्रणय चव्हाण (२४), रोहित देशभ्रतार (२७), पियुष बस्ताराज हिरवाने (२६) यांच्यासोबत बसला होता.
अगोदर प्रवीण चव्हाणने डेव्हीडकडे पाहून शिवीगाळ केली. डेव्हीडने जाब विचारला असता सर्वच आरोपींनी शिवीगाळ सुरू केली व त्यांनी डेव्हीडला घेरले. प्रवीण व प्रणयने डेव्हीडला पकडले आणि शुभमने डेव्हीडच्या छातीवर चाकूने वार केले. डेव्हीडच्या बहिणी मध्यस्थीसाठी धावल्या असता इतर दोन आरोपींनी त्यांना पकडून ठेवले. आरडाओरड ऐकून वस्तीतील इतर लोक धावून आले. तेव्हा सर्व आरोपी पळून गेले. डेव्हीडला लगेच मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. नैनसी यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.