नागपूरचा चांगला रिपोर्ट जगभरात जाणार - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 04:19 PM2023-03-18T16:19:19+5:302023-03-18T16:22:55+5:30
जी-२० परिषदेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये
नागपूर : जी२० परिषदेची प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपूरचा चेहरामोहरा बदललाय, अतिशय चांगली तयारी झाली आहे. आलेल्या लोकांना नागपूरचं वैभव पाहायला मिळेल. त्यांचं आपण उत्तम स्वागत करू, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. जी२० परिषदेसाठी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
आतापर्यंत मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जी परिषद झाल्या त्याच्या अतिशय चांगले रिपोर्ट जगभरात गेले आहेत. तसाच चांगला रिपोर्ट नागपूरचादेखील गेला पाहिजे असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळे उत्साही आहोत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
सी-२० साठी उद्या रंगीत तालीम; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा; २० मार्च रोजी उद्घाटन
नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून उत्तम तयारी करण्यात आली आहे. एकूणच सिविल सोसायटीची एंगेजमेंट असल्यामुळे वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधी येथे येणार आहेत त्यामुळे निश्चितच समाजोपयोगी ठराव त्याठिकाणी होतील असेही भाव फडणवीस यांनी व्यक्त केले.
दरम्यान, सी-२० परिषदेच्या प्रतिनिधींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत व नियोजित ठिकाणी प्रस्थान होण्याच्या दृष्टीने चोख व्यवस्था पार पाडण्यासाठी शनिवार, १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता रंगीत तालीम घेतली जाणार आहे. १९ मार्च रोजी सायंकाळपासून परदेशी व भारतीय प्रतिनिधींचे या परिषदेसाठी शहरात आगमन होणार आहे. २० मार्च रोजी दुपारी रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सामाजिक तथा आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सी-२० परिषदेचे उद्घाटन होणार आहे. सी-२० साठी तयार करण्यात आलेल्या अजेंड्यासह जगभरातील स्वयंसेवी संस्थांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय याबाबत या परिषदेत चर्चा व मंथन होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे.