परिचारिकेच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली;  मेयोच्या अस्थिरोग वॉर्डात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 09:55 PM2023-07-11T21:55:50+5:302023-07-11T21:56:13+5:30

Nagpur News इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालातील (मेयो) अस्थिरोग वॉर्डात मंगळवारी दुपारी आग लागल्याने खळबळ उडाली. मात्र, वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या दोन परिचारिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

A great accident was averted by the vigilance of the nurse; Fire at Mayo's orthopedic ward | परिचारिकेच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली;  मेयोच्या अस्थिरोग वॉर्डात आग

परिचारिकेच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली;  मेयोच्या अस्थिरोग वॉर्डात आग

googlenewsNext

 

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालातील (मेयो) अस्थिरोग वॉर्डात मंगळवारी दुपारी आग लागल्याने खळबळ उडाली. मात्र, वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या दोन परिचारिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे, आग लागलेल्या ठिकाणी एक निवासी डॉक्टर अडकून पडला होता, वॉर्डात प्रचंड धूर पसरल्याने रुग्ण तोंडाला रुमाल लावून बसले होते तर लहान मुलांना वॉर्डाबाहेर काढण्यात आले होते.

मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्सचा पहिल्या माळ्यावर अस्थिरोग विभागाचा वॉर्ड क्र. ३४ आहे. या वॉर्डात निवासी डॉक्टरांसाठी वेगळी खोली आहे. मंगळवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास इन्चार्ज सिस्टर वर्षा विंचूरकर यांना डॉक्टरांच्या खोलीच्या खिडकीतून धूर येताना दिसला. त्यांनी लागलीच वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या दुसऱ्या परिचारिका सरिता नायर यांना याची माहिती दिली. दोघींनी त्या खोलीकडे धाव घेतली. यावेळी एक निवासी डॉक्टर खोलीतच असलेल्या प्रसाधनगृहात आंघोळ करीत होता. त्याला आवाज देऊन सतर्क केले व लगेच दार न उघडण्याची सूचना केली. त्यानंतर दोन्ही परिचारिकांनी वॉर्डातील वीजपुरवठा खंडित केला. आगीत पलंगावरील गादीने पेट घेतला होता. शिवाय, रुग्णांना बँडेज बांधण्यासाठी कापूस व इतर साहित्य जळत होते. परिचारिकांनी बादलीत पाणी घेऊन आगीच्या दिशेने फेकू लागल्या. सतत पाण्याचा मारा केल्याने प्राथमिक स्वरूपात आग विझली. प्रसाधनगृहात अडकलेल्या डॉक्टरला बाहेर काढले. दरम्यान, वॉर्डात सर्वत्र धूर पसरला होता. दोन्ही परिचारिकांनी वॉर्डातील सर्व दारे-खिडक्या उघडल्या. याच दरम्यान महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान अग्निशमण उपकरण घेऊन धावत आले. आग ‘शॉर्टसर्किट’मुळे लागल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

- वॉर्डात रुग्णांसह चाळीसहून जास्त लोक होते

अस्थिरोग वॉर्डात आग लागली त्यावेळी वॉर्डात १९ रुग्णांसह त्यांचे नातेवाईक असे ४० लोक होते. आग वाढली असती तर बेडवरील अस्थिरुग्णांना बाहेर पडता आले नसते. परंतु दोन्ही परिचारिकांनी समयसूचकता दाखवत, प्रथम आगीवर नियंत्रण मिळविले आणि जेंव्हा धूर झाला तेव्हा सर्व रुग्णांना रुमालाने तोंड झाकायला सांगितले. एवढेच नव्हेतर, भरती असलेल्या लहान मुलांना बाहेर काढले.

- आलार्म वाजलाच नाही

आग लागल्यानंतर आलार्म वाजला नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे मेयोमधील ‘फायर ऑडिट’वरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मेयोच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राधा मुंजे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची प्राथमिक चौकशी केली जाईल.

Web Title: A great accident was averted by the vigilance of the nurse; Fire at Mayo's orthopedic ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग